पुणे : सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणकडून जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत प्रत्येक उपविभाग स्तरावर पाच बक्षिसे देण्यात येणार असून, एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच असे बक्षीस देण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागातील १५९ उपविभागांसाठी एकूण २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ही योजना विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी लागू नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

ज्या लघुदाब वीजग्राहकांनी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिलांचा ऑनलाइन पद्धतीने भरणा केला आहे, तसेच दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीजबिल किंवा त्याचा ऑनलाइन भरणा केलेला नाही अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. मागील महिन्याच्या वीजबिलाची थकबाकी १० रुपयांपेक्षा अधिक नसलेल्या ग्राहकांना १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लकी ड्रॉ’चे स्वरूप

एप्रिल, मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार असून, विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरदेखील बक्षीस जिंकल्याची माहिती दिली जाणार आहे. ग्राहकांनी लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर ( www. mahadiscom.in) भेट द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.