पिंपरी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली खेळाडू दत्तक याेजनेसाठी गतवर्षी अर्ज केलेल्यांना अजूनही त्याचे लाभ मिळालेले नाहीत. त्यातच यंदाही खेळाडूंकडून पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहेत. तर, गतवर्षीच्या अर्जदारांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने खेळाडू दत्तक याेजनेसाठी गतवर्षी अर्ज मागविले. त्यास राज्यस्तरीय खेळाडूंसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळलेल्या शहरातील खेळाडूंनी प्रतिसाद दिला. खेळाडू दत्तक योजनेसाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी समिती आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त, क्रीडा विभागाचे प्रमुख, शिक्षणाधिकारी, संबंधित खेळांचे अर्जुन किंवा शिवछत्रपती पुरस्कारविजेते, माजी राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका हद्दीत किमान तीन वर्षे रहिवासी असलेल्या खेळाडूंसाठी ही योजना आहे.
महापालिका शाळा, खासगी शालेय विद्यार्थी आणि अन्य खेळाडूंना या योजनेसाठी प्रवेश आहे. मैदानी खेळ, हॉकी, कबड्डी, कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजी, खो-खो, लॉन टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, रोलर स्केटिंग आणि क्रिकेट या खेळात शासकीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय, महाविद्यालयीन आणि इतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना अर्ज करता येतात.
योजनेत पात्र झालेल्या खेळाडूंना पीएमपी बस प्रवास मोफत, सकस आहार, दूध अथवा ठरावीक आहारभत्ता आणि मागणीनुसार खेळाचे साहित्य, गणवेश देण्यात येतात. लाभार्थींनी राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा प्रावीण्य मिळविल्यास त्यांना स्वतंत्र अर्जाद्वारे क्रीडा शिष्यवृत्ती किंवा आर्थिक साहाय्य देण्यात येते. पात्र खेळाडूंना फिजिओथेरपी, मानसोपचार आणि क्रीडा वैद्यक आदी सुविधा देण्यात येतात.
खेळाडूंना अद्याप लाभ नाही
गेल्या वर्षी या योजनेसाठी ४७ खेळाडूंनी अर्ज केले. अर्ज करून एक वर्ष होऊनही खेळाडूंना लाभच मिळाला नाही. लाभ मिळावा, यासाठी शहरातील खेळाडू व संघटनांनी पत्रव्यवहार केला. क्रीडा धोरण समितीच्या बैठकांतही हा विषय मांडण्यात आला. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप खेळाडूंनी केला.
खेळाडू दत्तक योजनेसाठी गेल्या वर्षी ४७ खेळाडूंनी अर्ज केले. यामधील एकाही खेळाडूला अद्याप लाभ मिळाला नसला, तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. यंदाही १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आलेल्या अर्जांची छाननी करून खेळाडूंना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील. – पंकज पाटील, उपआयुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका