जमिनीच्या वादातून सातारा येथील शेतकऱ्यांना धमकावण्याचा व त्यासाठी महापालिकेची अंबर दिव्याची मोटार वापरण्याचा प्रकार पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या भलताच अंगाशी आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील वडवाडी (ता. खंडाळा) गावातील कदम परिवाराशी शिंदे यांचे जमिनीवरून वाद आहेत, याच कारणावरून पुन्हा वाद उद्भवल्यानंतर ९ नोव्हेंबरला शिंदे तेथे गेले होते. यावेळी त्यांनी दिव्याच्या मोटारीत येऊन गुंडांच्या माध्यमातून दमदाटी व घराची मोडतोड केल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही झाली होती. तथापि, शिंदे हे बडे अधिकारी असल्याने पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर, शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खंडाळा पोलीस करत आहेत. सध्या तानाजी शिंदे हे पिंपरी पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी कधीतरी ते पोलिसात होते. तो ‘खाक्या’ ते नेहमीच वापरतात, अशी तक्रार नेहमीच केली जाते. साताऱ्यात दाखवलेला हाच ‘पोलिसी खाक्या’ त्यांच्या अंगाशी आला आहे. दरम्यान, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच साम्राज्य सेनेचे अंगद विश्वकर्मा यांनी तानाजी शिंदे यांच्या कृत्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. याबाबतची सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू, अशी सावध भूमिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतली आहे.