मोजे वाटून झाले, बुटांचे वाटप नाही!

मोजे वाटून झाले आहेत. वेळेवर साहित्य न देण्याची व हजारो विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची मंडळाची परंपरा याही वर्षी कायम आहे.

गैरव्यवहारामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या पिंपरी पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुना चव्हाटय़ावर आला आहे. पालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटण्यात येणारे बुटांचे वाटप रखडले आहे. मात्र, मोजे वाटून झाले आहेत. वेळेवर साहित्य न देण्याची व हजारो विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची मंडळाची परंपरा याही वर्षी कायम आहे. मंडळाच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ मनसेने शुक्रवारी मुख्यालयात आंदोलन करून पालिका दणाणून सोडली.
पिंपरी पालिकेच्या विद्यार्थ्यांना वाटप होणारे साहित्य कधीच वेळेवर दिले जात नाही, ही वर्षांनुवर्षे चालणारी परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून सदस्य व पुरवठादार यांच्यातील वादामुळे बुटांचे वाटप रखडले आहे. एकीकडे बूट मिळत नसताना विद्यार्थ्यांसाठी मोजे वाटून झाले आहेत. त्यामुळे नुसते मोजे घेऊन करायचे काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. बुटाच्या पुरवठादाराने मुदत संपत आली तरी बुटांचे वाटप केले नाही, ते काम तातडीने करावे, अशी मागणी काँग्रेसचे विष्णुपंत नेवाळे, श्याम आगरवाल या सदस्यांनी केली आहे. अन्यथा, कारवाई करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार, वेळेत बुटांचे वाटप न झाल्यास कारवाई करण्याची भूमिका मंडळ प्रशासनाने घेतली आहे. फक्त त्यादृष्टीने हालचाली होताना दिसत नाही. अशातच, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे व सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयात शुक्रवारी आंदोलन झाले. जोरदार घोषणाबाजी करून मनसैनिकांनी पालिका मुख्यालय दणाणून सोडले. आंदोलनाची कुणकुण लागल्याने सभापती फजल शेख व सदस्यांनी पोबारा केला. त्यामुळे आंदोलकांनी प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांना गाठले व प्रश्नांची सरबत्ती करून फैलावर घेतले. येत्या १० दिवसात बुटांचे वाटप झाले पाहिजे, यापुढे विद्यार्थ्यांना वेठीस धरता कामा नये, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pcmc education board boot student