बाहेरून आलेल्या मतदारांचे प्राबल्य

स्थानिकांपेक्षा बाहेरुन आलेल्या मतदारांची संख्या जास्त असलेल्या चिखलीत भावकी-गावकीची लढाई रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांना भावकीतील भाजपचे उमेदवार पांडुरंग साने यांच्यासह पांरपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेताजी काशिद यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. दोन साने विरूद्ध काशीद यांच्यातील ही लढत लक्षवेधी ठरणार असून ओबीसी महिला गटातील सामनाही चुरशीचा होणार आहे. प्रभागातील एकूण रागरंग पाहता बाहेरील नागरिकांचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात ‘क्रॉस वोटिंग’ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

चिखली गावठाण आणि मोरे वस्तीचा भाग असलेल्या या प्रभागात लातूर, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा, जळगाव तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून आलेल्या कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. सतत वाढत असलेली अनधिकृत बांधकामे हा येथील कळीचा मुद्दा आहे. विधानसभेच्या वेळी दत्ता साने यांनी आमदार महेश लांडगे यांचा हिरीरीने प्रचार केला. नंतर लांडगे भाजपमध्ये गेले. त्यांच्यासमवेत दत्ता सानेही भाजपमध्ये जातील, अशी अटकळ होती. मात्र तसे झाले नाही. साने यांनी शिवसेनेकडेही चाचपणी करून पाहिली. मात्र, पुढील राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून भाजप तसेच शिवसेनेत जाण्याचे टाळून साने यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभेपूर्वी दत्ता साने हे आमदार महेश लांडगे यांच्या जवळ जात असल्याचे पाहून पांडुरंग साने यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीत अनेक कार्यक्रम घेतले. मात्र, त्यांना सेनेकडून उमेदवारी मिळू शकली नाही. ऐनवेळी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. नेताजी काशिद हे दत्ता साने यांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. या तिघांमध्ये होणारी लढत चुरशीची होणार आहे.

chart

विधानसभा निवडणुकीत विलास लांडे यांना पराभूत करण्यासाठी दत्ता साने हे महेश लांडगे यांच्या बाजूने आघाडीवर होते. लांडे व साने एकाच पक्षात आहेत. तर, लांडगे भाजपमध्ये गेले आहेत. आता लांडे हे साने यांच्याबाबतीत काय ‘धोरण’ ठेवतात आणि आमदार लांडगे एकेकाळी मदतगार असलेल्या साने यांच्या बाबतीत कोणती भूमिका घेतात, यावर दत्ता साने यांचे भवितव्य ठरणार आहे. विद्यमान अपक्ष नगरसेवक  सुरेश म्हेत्रे यांच्या सूनबाई स्विनल म्हेत्रे या ओबीसी महिला गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या योगिता रणसुभे, राष्ट्रवादीकडून सोनम मोरे रिंगणात आहेत. प्रभागातील रस्त्यांचा विकास झाला असला तरी आरक्षणांचा विकास मात्र झाला नसल्याचा तसेच पाच वर्षांत कामे झाली नाहीत, असा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे.

पाच वर्षांत केलेली कामे हा राष्ट्रवादीचा प्रचाराचा मुद्दा आहे. तर, पाच वर्षांत विकासकामे झालीच नाहीत, अशी विरोधकांची टीका आहे. महापालिका निवडणुकीमध्ये येथील मतदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला

मतदान टाकतो तर विधानसभेला शिवसेनेच्या पाठीशी राहतो, असे दिसून आले आहे. यंदा नेमकी कशी परिस्थिती राहते, याविषयी उत्कंठा आहे.

  • विलास लांडे-महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला
  • नगरसेवक दत्ता साने – स्वाती साने पुन्हा िरगणात
  • ‘क्रॉस वोटिंग’ची दाट शक्यता
  • अनधिकृत बांधकामे हा कळीचा मुद्दा