• मुख्यमंत्री बालिश, खोटारडे आणि बोलबच्चन
  • सरकार पडलेच तर निवडणुकांना सामोरे जाऊ

उचलली जीभ की लावली टाळ्याला, खोटं बोल पणं रेटून बोल, अशी कार्यपद्धती असणारा बालिश आणि बोलबच्चन मुख्यमंत्री लाभला, हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी िपपळे सौदागर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. राष्ट्रवादी म्हणजे ‘कन्फ्युज पार्टी’ या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप म्हणजे ‘भ्रष्टाचारी जातीयवादी पार्टी’ अशी खिल्ली त्यांनी उडवली. भाजपने सर्व मित्र पक्षांना फसवल्याचे सांगून भाजप-सेनेच्या वादामुळे सरकार पडलेच तर थेट निवडणुकांना सामोरे जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे व पिंपरी-चिंचवडला दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले,की मुख्यमंत्री चिंचवडला येऊन गेले आणि बरेच काही खोटंनाटं बोलून गेले. राष्ट्रवादीला उखडून टाका, ही त्यांची भाषा मुख्यमंत्रिपदाला शोभत नाही. भाजप दोन-अडीच वर्षे सत्तेत आहे, त्यांनी कोणत्या महापालिकेचा विकास केला ते सांगावे, त्यानंतरच राष्ट्रवादीला सत्ता दिल्यास पिंपरी पालिका ‘रोडपती’ होईल, अशी भाषा करावी. गोरगरिबांना फसवणाऱ्यांना जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री जाईल तेथे जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. चिक्की घोटाळा, आदिवासी वस्तू खरेदीत घोटाळा, भूखंड घोटाळा, दाऊदशी संबंध अशा विविध प्रकरणात १५ पेक्षा जास्त मंत्री अडकले, त्यांना जेलमध्ये टाकले जात नाही. मात्र ‘क्लीन चीट’ दिली जाते. मुख्यमंत्र्यांची पारदर्शकतेची भाषा हास्यास्पद आहे. दररोज गुंडांना प्रवेश देण्याचे काम भाजपमध्ये सुरू आहे. जमीन घोटाळे, मंत्र्यांवर ताशेरे, पैसे घेऊन तिकीट वाटण्याचे प्रकार, बँका घोटाळ्यातील आरोपीस बँकेचे अध्यक्षपद, बिल्डरधार्जिणे निर्णय घेताना सामान्य नागरिक वेठीस, पोलिसांना मारहाणीच्या घटना, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ही पारदशऱ्कता आहे का? काळा पैसा भाजप नेत्यांकडेच आढळून येतो, शिवसेनेवर खंडणीखोर व माफियाचे आरोप करून त्यांच्याच बरोबर सत्तेत राहता, ही पारदर्शकता आहे का, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असूनही नागपूरची गुन्हेगारी वाढलेली आहे. दरारा न राहिल्याने पोलिसांवर हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे.

सत्तेत आल्यापासून भाजपने पिंपरी-चिंचवडसाठी काहीच केले नाही. ‘स्मार्ट सिटी’प्रकरणी पिंपरी-चिंचवडवर अन्याय झाला. शास्तीकराचे नुसतेच गाजर दाखवले. रेडझोनचा तिढा कायम आहे. कामगार क्षेत्र अस्वस्थ आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झालेच नाही. भाजप-सेनेचे आमदार-खासदार कमी पडल्याने पुणे-नाशिकचे रूंदीकरण रखडले. बैलगाडा शर्यतीच्या श्रेयासाठी त्यांच्यात फ्लेक्सबाजी सुरू आहे. मांडवली करणाऱ्यांनी गृहप्रकल्पांना खोडा घातला. पालकमंत्री असूनही गिरीश बापट यांनी शहराकडे लक्ष दिले नाही.

अजित पवार