पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मागील आर्थिक वर्षात थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली. १८ विभागीय कार्यालयांमार्फत ३४ हजार ७६९ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस बजावण्यात आली असून या मालमत्ताधारकांकडे १६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केल्याने मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु केल्याचे विभागाने सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात सात लाख २७ हजार निवासी, औद्याेगिक, मिश्र, माेकळ्या जमीन, औद्योगिक अशा मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत असलेल्या विविध सवलतींचा लाभ घेत चार लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. या मालमत्ताधारकांना ३५ कोटी १६ लाखांचा लाभ सवलतीपोटी देण्यात आला आहे.
मागील आर्थिक वर्षात ३४ हजार ७६९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. त्यांच्याकडे १६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षाच्या देयकांसोबत मागील थकबाकी भरण्याची नोटीस दिली होती. पहिल्या तिमाहित जूनपर्यंत थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे थकबाकी असलेल्या या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यास कर संकलन विभागाने सुरुवात केली आहे.
ऑनलाइन कर भरल्यास चार टक्के सवलत
महापालिकेने ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करात दहा टक्के सवलत दिली. शहरातील मालमत्ताधारकांचा ऑनलाइन कर भरण्यास प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य करावर चार टक्के सवलत दिली जाणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तात्काळ तो भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले.
शहरातील नागरिक हाेतायत हायटेक
महापालिकेने ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिक कधीही, काेठूनही कराचा भरणा करू शकतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षात ऑनलाइन कर भरण्यास दिवसेंदिवस नागरिकांची पसंती मिळत आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहित ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या ८८ हजार ९०, २०२१-२२ मध्ये एक लाख ११ हजार, २०२२-२३ मध्ये एक लाख २८ हजार १५, २०२३-२४ मध्ये दोन लाख नऊ हजार ६२५, २०२४-२५ मध्ये दोन लाख ६० हजार ७५७ तर २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहित ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या तीन लाख ३७ हजार एवढी झाली आहे.
मागील वर्षातील थकबाकी असलेल्या ३४ हजार ७६९ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस दिली आहे. या मालमत्ता जप्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तसेच ऑनलाइन कर भरणाऱ्यांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सामान्य करात चार टक्के सवलत दिली जाणार असल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.