पुणे महापालिकेला ‘सारथी’ उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास पिंपरी महापालिकेने नकारघंटा दर्शवली असून गेल्या अनेक महिन्यांपासून रखडवून ठेवण्यात आलेला याबाबतचा प्रस्ताव पिंपरी पालिका सभेने अखेर फेटाळून लावला आहे. पिंपरीचे आयुक्त राजीव जाधव यांनी बरेच प्रयत्न केले, मात्र त्यांच्या विनंतीलाही सत्ताधाऱ्यांनी फारशी किंमत दिली नाही.
पिंपरी पालिकेने यशस्वीपणे राबवलेल्या ‘सारथी’ उपक्रमाच्या धर्तीवर पुणे महापालिकेमार्फत तशाप्रकारे कॉल सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पिंपरीतील ‘सारथी’चे कामकाज विस्कळीत न होता तेथील उपलब्ध पायाभूत सुविधा व साधने अंशत: वापरून पुणे महापालिकेचे कॉल सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती पुणे पालिकेने केली होती. दोन्ही महापालिकांचा सामंजस्य करार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. धोरणात्मक बाब असल्याने हा प्रस्ताव सभेसमोर मांडण्यात आला. सुरूवातीला विचार करू म्हणून गेल्या काही सभांमध्ये तहकूब ठेवण्यात आलेला हा प्रस्ताव अखेर पालिका सभेने फेटाळून लावला. आयुक्त जाधव यांनी हा प्रस्ताव मान्य व्हावा, यासाठी प्रयत्न केला होता. तथापि, सत्ताधारी राष्ट्रवादीने अशाप्रकारे ‘सहकार्य’ करण्यास नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2015 रोजी प्रकाशित
‘सारथी’ साठी पुणे महापालिकेला ‘सहकार्य’ करण्यास पिंपरी पालिकेची नकारघंटा
सत्ताधारी राष्ट्रवादीने अशाप्रकारे ‘सहकार्य’ करण्यास नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.
Written by दिवाकर भावे

First published on: 24-09-2015 at 03:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc not supporting for sarathi