पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे. तर, राज्यात पहिला क्रमांक आला आहे. गतवर्षी पिंपरी-चिंचवड शहराचा देशात १३ वा तर राज्यात तिसरा क्रमांक आला होता.

स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. २०२४ च्या या स्पर्धेमध्ये पाच हजरांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात सातवा क्रमांक आला.

शहरातील कचऱ्याचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावली जाते.  प्रत्येक प्रभागात घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. स्रोताजवळ प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, रीसायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा आदींचा वापर केला जात आहे. यामुळे शहराने सात स्टार कचरा मुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त केले आहे. 

मलनिस्सारणाची कार्यक्षम व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि पाण्याचा पुर्नवापर केला जातो. मलमूत्र मुक्त परिसर, नद्या-नाले स्वच्छ ठेवणे आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे या निकषांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने चांगली कामगिरी केल्याने वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेसाठी झटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे, सफाई कर्मचारी, अधिकारीवर्ग, आणि स्वयंसेवी संस्थांचे अभिनंदन करतो. हा सन्मान सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. येत्या काळात जबाबदारी आणखी वाढली असून,त्यादृष्टीने आणखी अनेक शाश्वत उपक्रम राबविले जातील. आता पुढील उद्दिष्ट म्हणजे शाश्वत स्वच्छता, घनकचरा शून्य धोरण, जलपुनर्वापर आणि पर्यावरणपूरक शहर यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत’. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महापालिकेला स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद असून, आरोग्य विभाग तसेच शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकाऱ्यांमुळे हे शक्य झाले. येत्या काळात आणखी जोमाने काम केले जाईल. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी पुढच्या वेळी देशात सर्वप्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे’ आरोग्य विभागाचे उपायुक्त  सचिन पवार यांनी सांगितले.