तरंगता पूल पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची बैठकीत मागणी

बोपखेलचा पूर्वीचा रहदारीचा रस्ता पुन्हा सुरू होण्याच्या सर्व शक्यता मावळल्यानंतर पिंपरी महापालिकेने आता बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या नव्या उड्डाण पुलाच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या पुलाची सुधारित रचना तसेच वाढीव खर्चावर चर्चा झाली. यापूर्वी उड्डाण पुलासाठी २४ कोटी खर्च होणार होता.

तथापि, बदलत्या रचनेनुसार ४२ कोटी रुपये खर्च होणार असून त्याची तयारी महापालिकेने दर्शवली. पुलाचे काम होईपर्यंत तात्पुरत्या तरंगता पूल पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी बैठकीत केली.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत लष्कराचे तसेच अन्य महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पिंपरी पालिकेकडून सहशहर अभियंता राजन पाटील, बोपखेलच्या नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे, संजय काटे आदी उपस्थित होते. नव्या पुलाची रचना असलेला नकाशा बैठकीत सादर करण्यात आला. त्यासाठी होणाऱ्या ४२ कोटी खर्चास मान्यता देण्याची तयारी पालिकेने दर्शवली.

नव्या पुलाचे काम सुरू होऊन ते पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत नदीवर तात्पुरता तरंगता पूल सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली. येत्या मंगळवारी पुन्हा बैठक होणार आहे. या संदर्भातील सुधारित प्रस्ताव संरक्षण खात्याकडे पाठवण्यात येणार आहे.

बोपखेल येथील रहदारीचा रस्ता लष्कराने बंद केल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा पूल उपलब्ध करून दिला. पावसाळ्यात तो पूल धोकादायक ठरू शकतो, असे सांगून तो पूलही काढण्यात आला.

कुंभमेळ्याच्या धर्तीवर तात्पुरता पूल उभारून देऊ, असे आश्वासन पर्रिकरांनी दिले असले तरी त्याची पूर्तता झाली नाही. नुकतेच संरक्षणमंत्र्यांनी याबाबतचा अहवाल मागवून घेतला आहे.

या पाश्र्वभूमीवर, बुधवारी झालेल्या बैठकीनंतर उड्डाण पुलाच्या कामाला चालना मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.