संतश्रेष्ठ तुकोबा आणि माउलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. ९ आणि १० जुलैला पालख्यांचे शहरात आगमन होत असून त्या दृष्टीने आयुक्त राजीव जाधव यांनी दोन्ही पालखी मार्गाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचना केल्या.
महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना सतरंज्या वाटप करण्यात येणार आहेत. दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम होणार असून त्या दृष्टीने पालिकेच्या व खासगी शाळा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. वारक ऱ्यांना २४ तास मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. पालखी मार्ग तसेच विसाव्याच्या ठिकाणाजवळील कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. जागोजागी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.