पिंपरी : गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढविण्यासाठी महापालिकेने कृत्रिम हौदांची संख्या १६ वरून ३२ वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. शाडू मातीच्या मूर्तींसाठी १६ नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत. पीओपी मूर्तींसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे मूर्तींचे योग्य वर्गीकरण, पर्यावरणपूरक विसर्जन आणि सुलभ व्यवस्थापन शक्य होईल, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमींची बैठक घेतली. त्या वेळी आयुक्त सिंह यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे या वेळी उपस्थित होते.
‘मूर्ती विक्रेत्यांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रणाली लवकरच सुरू करण्यात येईल. नागरिक, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करून शहराचा उत्सव अधिक पर्यावरणस्नेही आणि आदर्श करावा, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी समन्वयाने काम करावे,’ असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले.
‘सार्वजनिक गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या सहकार्याने प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यासोबत विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,’ असे निर्देशही त्यांनी दिले.
‘पुनरावर्तन’ मोहीम राबविणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेत यंदा गणेशोत्सव काळात ‘इको एक्झिस्ट’ फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने ‘पुनरावर्तन’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर ती माती पुन्हा संकलित करून मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर मूर्तिकार ती माती पुन्हा मूर्तीसाठी वापरू शकणार आहेत.
असा होणार पर्यावरणपूरक उत्सव
– कृत्रिम हौदांची संख्या १६ वरून ३२ वर
– शाडू मातीच्या मूर्तींसाठी १६ नवीन कृत्रिम हौद
– पीओपी मूर्तींसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था
– यामुळे मूर्तींचे योग्य वर्गीकरण, पर्यावरणपूरक विसर्जन आणि सुलभ व्यवस्थापन
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना महापालिकेच्या प्रत्येक विभागाने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. पीओपी आणि शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनीदेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन महापालिकेला सहकार्य करावे. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका