चढउतार, विजेचे खांब, बसथांब्यांमुळे पादचारी त्रस्त
वाहनांचा वापर मर्यादित ठेवून शक्य तिथे पायी चालण्यासारख्या पर्यावरणपूरक व आरोग्यदायी मार्गाचा पुरस्कार करण्याचा सध्याचा काळ. पण पुण्यातील प्रमुख रस्त्यांची सद्य:स्थिती पादचाऱ्यांना ‘चालून दाखवाच,’ असे आव्हान देणारी आहे. पदपथावर अनेक ठिकाणी चढउतार आहेतच, त्याशिवाय त्यावर लावलेल्या लाद्यांमध्येही एकसमानता नाही. विजेचे खांब, डीपी बॉक्स, बस स्टॉप, दीशादर्शक फलक यांमुळे पदपथ अडलेले आहे. त्यामुळे पदपथावरून चालताना अडथळय़ांची शर्यत पार पाडावी लागत असल्याचे ‘लोकसत्ता’च्या पाहणीत दिसून आले.
पदपथांची कमी-जास्त रुंदी, ज्येष्ठ नागरिकांना अतिशय त्रासदायक ठरणारी कमी-जास्त उंची या पदपथांबद्दलच्या अडचणी प्रत्येकच प्रमुख रस्त्यावर बघायला मिळाल्या. पदपथावर लावलेले पेव्हिंग ब्लॉक्स वा टाइल्समध्येही कुठेही समानत नाही. काही ठिकाणी रस्त्यांच्या मधल्या भागात पदपथ बेपत्ताच आहेत, तर कुठे ते उखडलेल्या स्थितीत सोडून देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक्सही मधूनच उखडले असून फग्र्युसन रस्त्यासारख्या काही ठिकाणी तर चक्क घसरडय़ा बाथरूम टाइलसारख्या टाइलच पदपथावर लावल्या आहेत.
पदपथावर ओळीने उभारले गेलेले डीपी बॉक्स, मध्येच उभे राहिलेले विजेचे खांब आणि दिशादर्शक फलक, फुटपाथ व्यापून राहिलेले बसस्टॉप अशा विविध अडथळ्यांमुळे पादचाऱ्यांना सतत रस्त्यांवर उतरणे आणि अनेक ठिकाणी रस्त्यांवरूनच चालणेच भाग पडत असल्याचे दिसून आले.