शनिवारवाडा परिसरात पादचारी तरुणाला पोलीस असल्याच्या बतावणीने पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडून १५ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरटा इरफान सय्यद आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल भीमराव खंदारे (वय २३, रा. तोफखाना, शिवाजीनगर) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खंदारे रात्री पावणेबाराच्या सुमारास शनिवारवाडा परिसरातून निघाला होता. त्या वेळी सय्यद आणि साथीदारांनी त्याला अडवून पोलीस असल्याची बतावणी केली. सय्यदने त्याला बनावट ओळखपत्र दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर सय्यदने ऑनलाइन पद्धतीने १५ हजार रुपये खात्यात हस्तांतरित केले. खंदारेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करत आहेत.