पिंपरी- चिंचवडमधील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी हाती घेतला आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नोहेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी शहरवासीयांना करावी लागलेली प्रतीक्षा आता संपली आहे.
हेही वाचा- पुणे: भारतीय उपखंडात दोन कोटी लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात?
चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्यावतीने उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी सोमवारी करण्यात आली. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, यांच्यासह महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
हेही वाचा- अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वयाचा विदर्भातील शेतकऱ्यांना फटका
आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणऱ्या २६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्यावतीने चिखलीत ८ हेक्टर परिसरात उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दोन लाईन जोडायच्या राहिल्या आहेत. त्याचे काम ८ दिवसांतच होईल. येत्या १५ दिवसांत पाणी सोडण्याची चाचणी होईल. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात निघोजेतून ५० एमएलडी पाणी उचलले जाईल.
हेही वाचा- पुण्यात सकाळपासून पावसाची रिपरिप; शाळेला जाणाऱ्या मुलांची, पालकांची उडाली तारांबळ
पुढील तीन महिन्यात आणखी ५० एमएलडी पाणी उचलण्यात येईल. त्यातून समाविष्ट भागातील तळवडे, चिखली, मोशी, निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी डुडुळगाव, चहोली, दिघी या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. या भागाला पाणी मिळाल्याने शहराच्या उर्वरित भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पाण्याच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचे समाधान वाटते. अस आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.