चऱ्होलीतील शेतजमिनींचे निवासीकरण करण्याचा वादग्रस्त विषय सत्तारूढ राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर रेटून मंजूर केला. हा विषय मंजूर होण्यामागे व त्यास कडाडून विरोध करण्यामागे सरळसरळ ‘टक्केवारीचे’ राजकारण आहे. ‘तुपाशी’ असलेला बाजूने तर ‘उपाशी’ राहिलेला विरोधात असे साधारण चित्र पुढे आले आहे. नेत्यांनी आपल्याला अंधारात ठेवून तडजोडी केल्या, या भावनेतून सदस्यांनी थयथयाट केला.
जुलै महिन्याची तहकूब सभा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चालली. प्रारंभीच खड्डय़ांचा विषय काढून त्यावर दोन-अडीच तास भाषणे चालवून चऱ्होलीच्या विषयासाठी व्यवस्थित ‘फिल्डींग’ लावण्यात आली. सहानंतर बहुतांश नगरसेवकांनी काढता पाय घेतला. तर, वेळेचे बंधन असल्याने पत्रकारही निघून गेले. मोकळे रान झाल्यानंतर हा विषय चर्चेला आला. तेव्हा चर्चेत बराच गदारोळ झाला. उपसूचनेच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीतील नगरसेवकांमध्येच जुंपली. नेहमी गळा फाडून सत्ताधाऱ्यांना विरोध करणारे काहीजण शांततेत निघून गेले, तर काहींनी सोयीस्कर मौन धारण केले.
राष्ट्रवादीचे नितीन काळजे व तानाजी खाडे यांची तसेच शिवसेनेच्या सुलभा उबाळे व मनसेच्या वैशाली मराठे यांनी मांडलेल्या उपसूचना सत्ताधाऱ्यांच्या व्यवहारात बसत नसल्याने त्या फेटाळण्यात आल्या. सभेत मतदानाची खेळी झाली व अपेक्षेनुसार राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर केला. सभेत विरोध करणाऱ्या विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनी दुसऱ्या दिवशी अशाप्रकारे ठराव मंजूर करण्यास विरोध असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आणि मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण नेण्याचा इशाराही दिला. उबाळे यांनीही हा विषय ‘धंदा-पाण्याचा’ असल्याची टीका केली. या वादविवादातून चऱ्होलीतील निवासीकरणाच्या आतबट्टय़ाच्या व्यवहारातील बऱ्याच गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. या सगळ्या ‘धंद्यात’ राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आघाडीवर असून त्यांनी विरोधी नेत्यांना आवश्यक मलिदा दिला आहे. नव्या सदस्यांना या व्यवहाराची भनक लागली. आपल्याला काहीच नाही, या भावनेतून ते तुटून पडले आणि राडा झाल्याप्रमाणे वातावरण तयार झाले.