पुणे : अत्यावश्यक सेवा सोडून इतर उद्योग, व्यवसाय सुरू करता येणार नसले, तरी अत्यावश्यक सेवेतील पुणे जिल्ह्य़ातील ९८८ उद्योग, व्यवसायांना उद्योग विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये अन्न, दूध, औषधे निर्माण, सॅनिटायझर, वैद्यकीय साहित्य निर्मिती आणि संबंधित उद्योग व त्यांच्यासाठी आवश्यक कच्चा माल तयार करणाऱ्या उद्योग, व्यवसायांचा समावेश आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, तळवडे, हवेली तालुका आणि पीएमआरडीए क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय सुरू न करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

दरम्यान, जिल्ह्य़ातील अत्यावश्यक सेवेतील ४५४ उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ होऊन आतापर्यंत ५८८ उद्योग, व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. या अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना परवानगी देताना सर्वच्या सर्व कर्मचारी उपलब्ध होतीलच असे नाही, त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या कर्मचाऱ्यांसह उद्योग सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्य़ातील वालचंदनगर इंडस्ट्रीज, पाटस, भिगवण येथील बिन्ना सिमेंट इंडस्ट्रीज, बल्लारपूर पेपर इंडस्ट्रीज यांनाही परवानगी देण्यात आली आहे.