‘‘मी फार मोठा छायाचित्रकार नाही, छायाचित्रण माझा छंद आहे. पण हा छंद चोरूनमारून काळोखात करण्याचा नव्हे तर स्वच्छपणे दिवसाढवळ्या करण्याचा आहे! माझ्या छंदामुळे लोकांना आनंद मिळतो. ज्या घटना लोक स्वत: पाहू शकत नाहीत त्या जगासमोर आणणे हा छायाचित्रणाचा उद्देश असतो. कुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी कधी छायाचित्रण करू नका,’’ अशा शब्दांत ‘सर उद्धव ठाकरे’ यांनी विद्यार्थ्यांना कोपरखळ्या मारत छायाचित्रणाचे धडे दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग यांच्यातर्फे ‘वर्कशॉप इन फोटोजर्नालिझम’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख आणि प्रसिद्ध छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छायाचित्र काढून बुधवारी करण्यात आले. संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. माधवी रेड्डी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, विश्वस्त कार्यवाह श्याम दौंडकर या वेळी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘चांगला कॅमेरा हातात आला की छायाचित्रण आले, असा अनेकांचा समज असतो. छायाचित्रण शिकवून येत नाही. ही कला रक्तातच असावी लागते. छायाचित्र बोलके असावे लागते. बेभान झाल्याशिवाय ते मिळत नाही. मी ‘अ‍ॅग्फा क्लिक ३’ आणि ‘याशिका’ या कॅमेऱ्यांवर छायाचित्रण शिकलो. ते फिल्म फोटोग्राफीचे दिवस असल्यामुळे छायाचित्रणाच्या फिल्म्स डेव्हलप करण्यासाठी रात्र-रात्र जागावे लागायचे. ‘ड्राय फोटोग्राफी’ सुरू झाल्यावर या तांत्रिक गोष्टीही गौण झाल्या आहेत. छायाचित्रण हा माझा प्राणवायू आहे. राजकारणाच्या धकाधकीतही मी तो आनंद घेतच राहणार. हेलिकॉप्टरमधून छायाचित्रण करणे ही अडथळ्यांची शर्यत असते! यात प्रत्यक्ष छायाचित्रणापेक्षा केंद्र आणि राज्याच्या परवानग्या मिळवतानाच अधिक त्रास होतो. हेलिकॉप्टर उडू लागल्यावर वाऱ्याचा झोत आणि हेलिकॉप्टरची धडधड वाढते. अशा वेळी काहीही घडू शकते. बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे काढण्याचा आनंद वेगळाच असे. ते छायाचित्र काढण्यासाठी २-५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ देत नसत. त्यांना खूप मस्का लावावा लागे! पक्षाच्या सभा आणि मोर्चामध्येही जनता आणि शिवसैनिक ज्या प्रेमाने स्वागत करतात ते पाहून अनेकदा ‘आत्ता हातात कॅमेरा हवा होता’ असे वाटते.’’
‘पुण्याचा इतिहास छायाचित्रांतून जिवंत व्हावा’
पुण्यातील जुने वाडे आता उरले नसले तरी शहराचा इतिहास सांगणाऱ्या छायाचित्रांचे कलादालन असावे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. छायाचित्रणाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंतची पुण्याचे दर्शन घडवणारी छायाचित्रे तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांची छायाचित्रे एकत्रित करण्यात पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.