पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) मराठी स्पर्धात्मक चित्रपट विभागातील सात चित्रपटांसह पाच अप्रदर्शित चित्रपट पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. त्यामुळे ‘पिफ’मधील मराठी चित्रपटांचा टक्का वाढला आहे.
१३ व्या महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागामध्ये श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’, बाबुराव खराडे दिग्दर्शित ‘ख्वाडा’, अविनाश अरुण दिग्दर्शित ‘किल्ला’, समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘प्रकाश बाबा आमटे’, किरण यज्ञोपवीत दिग्दर्शित ‘सलाम’ आणि महेश लिमये दिग्दर्शित ‘यलो’ हे सात चित्रपट पाहता येणार आहेत. याखेरीज ‘मराठी सिनेमा टुडे’ या विशेष विभागमध्ये ‘आभास’ (दिग्दर्शक- गजानन कुलकर्णी), ‘बरड’ (दिग्दर्शक- तानाजी घाडगे), ‘बायोस्कोप’ (दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे, गिरीश मोहिते, रवी जाधव, विजू माने), ‘साम दाम दंड भेद’ (दिग्दर्शक -नीलिमा लोणारी) आणि ‘तिचा उंबरठा’ हे पाच अप्रदर्शित मराठी चित्रपट दाखविले जाणार आहेत.  
चैतन्य ताम्हाणे या युवा मराठी दिग्दर्शकाच्या ‘कोर्ट’ या बहुचर्चित चित्रपटाने तर मुख्य आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेमध्ये स्थान पटकाविले आहे. आंतरराष्ट्रीय १४ चित्रपटांच्या या स्पर्धेतील हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. महेंद्र तेरेदेसाई या आणखी एका मराठी दिग्दर्शकाच्या ‘डोंबिवली रिटर्न्स’ या हिंदी  चित्रपटाचा प्रीमियरही या महोत्सवामध्ये होणार आहे. ‘ट्रिब्युट’ विभागामध्ये अभिनेत्री स्मिता तळवलकर निर्मित ‘सवत माझी लाडकी’ हा चित्रपट दाखविला जाणार आहे. ‘पिफ’च्या या घोषणेचे स्वागत करीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी या महोत्सवाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांचा आलेख पुन्हा एकदा उजळला असल्याची भावना व्यक्त केली.
 ‘पिफ’च्या विस्तारित महोत्सवाचे आज चिंचवडला उद्घाटन
 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) विस्तारित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (९ जानेवारी) अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे. चिंचवड येथील बिग सिनेमा येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते व पिफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी आयुक्त राजीव जाधव, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवातील ५६ चित्रपट चिंचवड येथे होणार आहेत.