पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील वाढत्या खड्ड्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अभियंत्यांना खड्डे भरण्याचे प्रशिक्षण दिले आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या तसेच इतर खड्ड्यांचे निराकरण करण्यासाठी अभियंत्यांना ‘खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली’चा वापर व खड्डे भरण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी प्रशिक्षण दिले. सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनि:सारण व शहर दळण वळण विभागातील कार्यकारी अभियंते, उप अभियंते, कनिष्ठ अभियंते, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असे एकूण १५७ अभियंते सहभागी झाले होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होत असून, कोंडीत भर पडत आहे. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. खड्ड्यांकडे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या २६ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. खड्डे बुजविल्यानंतरही नवीन खड्डे वाढत आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्याबाबतची कार्यप्रणाली, खड्डे कसे बुजवायचे याबाबतचे प्रशिक्षण अभियंत्यांना देण्यात आले.
महापालिकेने ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे ॲप विकसित केले आहे. शहरातील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली’वर खड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर कार्यवाही करण्यासाठी अभियंत्यांना देखील या प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात रस्त्यांवरील खड्डे शोधण्यापासून ते जलद गतीने त्याचे निवारण करण्याच्या प्रक्रियेपर्यंत प्रत्येक पायरीची माहिती देण्यात आली. तज्ज्ञ सल्लागार विकास ठाकर यांनी हे प्रशिक्षण दिले.
खड्डे भरणे तंत्रज्ञानाबाबत माहिती
‘पॉटहोल मॅनेजमेंट’ ॲपचा वापर कसा करावा, जलनिरोधक खड्डे भरणे तंत्रज्ञानानाबाबत माहिती देण्यात आली. तक्रारीवर तत्काळ प्रतिसादासाठी असणाऱ्या ऑटो मेकॅनिझम प्रणालीसह रस्ता, जलनि:सारण व पाणी पुरवठा अशा विभागातील समन्वयाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
खड्ड्यामध्ये जलनिरोधक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा. तत्काळ खड्डे बुजविणे, पाणीपुरवठा, जलनिःसारण आणि रस्ते विभागाचा समन्वय साधणे याबाबत अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत.- मकरंद निकम,शहर अभियंता,पिंपरी-चिंचवड महापालिका