पिंपरीत कारचालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. कारमधून गोमांसची तस्करी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चालकाला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला असता ही घटना घडली.

पिंपरीत गोमांसची तस्करी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी दिघी येथील मॅगझिन चौकात सोमवारी पहाटे सापळा रचला. पोलिसांना संशयित कार येताना दिसली. त्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना बघून चालकाने कारचा वेग वाढवला. तिथे तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरेश शिंदे यांनी धाडस दाखवत गाडीच्या समोर येऊन चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने थेट पोलिसांच्या अंगावरच गाडी घातली आणि घटनास्थळावर कार सोडूनच पळ काढला. दिघीतील ग्रामस्थांनी अखेर ती कार थांबवली. यानंतर कारचालक फरार झाला.

या धडकेत कॉन्स्टेबल सुरेश शिंदे हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या कारमध्ये मांस सापडले असून ते गोमांस आहे की नाही, याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल, यानंतर ते नेमके काय आहे, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.