पिंपरी : हुडी परिधान करून महिलांचे दागिने, सोनसाखळी चोरणाऱ्या सराईतला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले असून, साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गौरव अनिल सरोदे (वय २४, रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे घडले होते. लागोपाठ घडलेल्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. सलग पाच दिवस चिखली आणि रावेत परिसरातील महापालिकेने बसविलेले व खासगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. लाल आणि निळी हुडी परिधान करून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारा आरोपी हा एकच असल्याचे निष्पन्न झाले. गौरव हा चाकण परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
पोलीस आल्याची माहिती मिळताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी १५ किलोमीटर पाठलाग करून त्याला दुचाकीसह पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चार मंगळसूत्र चोरी, चार घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा असे नऊ गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून चार सोन्याचे मंगळसूत्र, एका दुचाकीसह सहा लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ तपास करत आहेत.