पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा सात वर्षीय मुलाचं घरासमोरून अपहरण, दोन रात्र तीन दिवस नजरकैदेत अन ५० तासानंतर सुटका…. अगदी चित्रपटाला साजेसं हे अपहरणनाट्य पिंपरी-चिंचवडमध्ये घडलं. त्यातून सात वर्षीय ओमची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, या अगोदर देखील शहरात तीन महिन्यांपूर्वी खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीच अपहरण झालं होतं. परंतु, यात त्या चिमुकलीची अपहरणकर्त्यांनी हत्या केली. आर्थिक चणचणीतून अपहरणाची ही प्रकरणे घडली असली तरी त्यामागे ओळखीचा गैरफायदा घेतल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे सदनिकाधारकांनी किंवा मालकांनी घर भाड्याने देताना किंवा कामगारांना कामावर ठेवताना पुरेशी काळजी घ्यायला हवी, असेही प्रकर्षाने दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडच्या पूर्णांनगरमध्ये खेळत असलेल्या सात वर्षीय ओम खरातचं घरासमोरून दोन तरुणांनी अपहरण केलं. ओम तब्बल ५० तास अपहरणकर्त्यांच्या नजरकैदेत होता. हे अपहरण जणू एका चित्रपटाला साजेसंच होतं. गाडीतून तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात आले आणि त्यांनी साई निवास सोसायटीतील त्यांच्या घरासमोरून ओमला गाडीत घालून ते पसार झाले. काही वेळातच त्यांनी ओमच्या वडिलांना फोन करून पोलिसांना याबाबत माहिती न देण्याची धमकी दिली. त्यामुळं ओमचा जीव धोक्यात होता. मात्र पोलिसांनी सर्व सूत्र आणि शक्ती पणाला लावत ४०० पोलीस कर्मचारी कामाला लावले आणि अपहरणकर्त्यांना मुलाला सुखरूप सोडण्यास भाग पाडलं. ओमची सुखरूप सुटका झाली. याबाबत दोन तरुणांना अटक देखील करण्यात आली. अक्षय जामदारे आणि रोशन शिंदे अस या दोन अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

या दोघांचे वय अनुक्रमे २० आणि २१ आहे. विशेष म्हणजे २८ जून २०१७ रोजी पिंपरी-चिंचवडमधील वडमुखवाडी येथून ४ वर्षीय तनिष्का आरुडे हिचे घरासमोरून भरदिवसा अपहरण झाले होते. यात २० आणि २२ याच वयोगटातील तरुणांनी खंडणीसाठी तनिष्काच अपहरण करून हत्या केली होती. या दोन्ही घटना मनाला चटका लावणाऱ्या आहेत. जवळील व्यक्तींनीच घात केल्याचं यात समोर आलं आहे.

वडमुखवाडी येथून २८ जून रोजी अपहरण झालेल्या चार वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याचं समोर आले होते. हे अपहरण २ लाख रुपयांसाठी केले होते आणि त्यातूनच तनिष्काची हत्या करण्यात आली होती. हत्या करून चिमुकलीचा मृतदेह अकोल्यातील मूर्तिजापूर येथे पुरल्याचे आरोपींनी दिघी पोलिसांकडे कबुली दिली. २८ जून रोजी हे अपहरणाच नाट्य घडलं आणि तब्बल सहा दिवसांनी हा सर्व प्रकार समोर आला. त्यामुळं पोलिसांचा तपास बाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यातील एक आरोपी हा आरुडे कुटुंबियांना आर्थिक दृष्ट्या जवळून ओळखत होता. तसेच त्यांच्या इमारतीत भाड्याने राहात होता.

शुभम जामणिक वय वर्षे २२, प्रतीक साठले वय वर्षे २१ अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. मात्र एका गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर या दोन्ही घटनेतील आरोपी हे जवळचे असून तरुण व्यक्ती आहेत. ओमच्या अपहरणातील आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तर शुभम जामणिक हा फिर्यादीच्या इमारतीत भाड्याने राहत होता. त्यामुळं या दोन्ही घटनेतील आरोपींना अपहरण करण्यास वेळ लागला नाही. दोघांनीही आर्थिक चणचणीतून अपहरण केलं होतं. ओमची सुखरूप सुटका करण्यात निगडी पोलिसांना यश आलं पण दिघी पोलिसांना तनिष्काला वाचवण्यात यश आलं नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. त्यामुळे इथून पुढे कामावर किंवा इमारतीतील सदनिका केवळ तरुणांना भाड्याने देताना पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यायला हवी. घर भाड्याने देताना नियमाप्रमाणे पोलिसांकडे भाडेकरूंना स्वतःची नोंदणी करायला लावावी.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad abduction case need to focus on important issues
First published on: 28-09-2017 at 09:16 IST