पिंपरी : वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, बदललेल्या राहणीमानामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच ध्वनी प्रदूषणातही वाढ झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समाेर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरण क्षेत्रातील स्थितीचा मागोवा घेणारा २०२४-२५ चा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात क्षेत्र आणि लोकसंख्या, हवामानातील बदल, पर्जन्यमान, पाणीपुरवठा, नदी-नाले-तलावांची सद्यस्थिती, जलनि:स्सारण योजना व मैलाशुद्धीकरण प्रकल्प, हवेतील व ध्वनी प्रदूषणाचे स्तर, मृदा गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा वापर, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्याने, उद्योगधंदे, आपत्ती व्यवस्थापन, शहर नूतनीकरण योजना आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी एक लाख ७३ हजार ५७६ वृक्षांची लागवड केल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

१९ लाख वाहने

पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या सुमारे २५ लाख आहे. वाहनांची संख्या १९ लाख आठ हजार ५५० आहे. गतवर्षीच्या तुलनेत नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरात नोंदणी होणाऱ्या एकूण वाहनांपैकी ३.५ टक्के ई-वाहनांचे प्रमाण आहे. ५० हजार ९०२ ई-वाहनांची नोंद झाली आहे.

कचऱ्यापासून वीज, बायोगॅस निर्मिती

माेशीतील कचरा डेपाेत आतापर्यंत तीन लाख ५१ हजार ५४२ मेट्रीक टन घरगुती कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यापासून १३ काेटी ७९ लाख ४० हजार ८५९ युनिट्सची वीज निर्मिती झाली. बांधकाम राडारोडा व्यवस्थापन प्रकल्पामधील ३९ हजार ८२७ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. हॉटेल वेस्ट टू बायोगॅस या प्रकल्पामध्ये तीन हजार ५९३ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. यामधून एक लाख १२ हजार २४९ किलोग्रॅम बायोगॅसची निर्मिती करण्यात आली.

ध्वनी प्रदूषणात वाढ

शहरातील तळवडे, भाेसरी एमआयडीसी या औद्याेगिक पट्यासह पिंपरी कॅम्प, पिंपळे साैदागर परिसरातील माॅल, बाजारपेठ, भाजी मंडई, मेट्राे परिसरात ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. ध्वनी प्रदूषण पातळी विहित मर्यादेपेक्षा अधिक आहे.

पवना नदी सर्वाधिक प्रदूषित

शहरातून पवना नदी २४.४ किलाे मीटर, इंद्रायणी २०.६ तर मुळा नदी १२.४ किलाेमीटर अंतर वाहते. शहराच्या मध्यभागातून वाहणारी पवना नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. नाल्याचे पाणी प्रक्रिया न करता नदीत साेडले जाते. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. त्याखाेलाखाल शहराच्या उत्तेरकडून वाहणारी इंद्रायणी नदी प्रदूषित आहे. औद्याेगिक क्षेत्रातील रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण हाेत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर शहराच्या दक्षिणेकडून वाहणारी मुळा नदी प्रदूषित आहे.