पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या शहर कार्यकारिणीवरून नाराजी उफाळून आली आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन सरचिटणीस पदे दिली. पण, पिंपरीला डावलल्याचा आक्षेप घेत नवनियुक्त उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी राजीनामा दिला आहे.
या कार्यकारिणीत एक संघटन सरचिटणीस, तीन सरचिटणीस, आठ उपाध्यक्ष आणि आठ सचिव आहेत. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कार्यकारिणीवर वर्चस्व दिसून येत आहे. काटे यांच्याकडे १३ मे रोजी शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. तीन महिन्यांनंतर काटे यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. मागील कार्यकारिणीत गोठवलेले संघटन सरचिटणीस पद पुन्हा निर्माण केले आहे. चिंचवड मतदारसंघातील माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांची संघटन सरचिटणीसपदी नियुक्ती केली. चिंचवडमधीलच मधुकर बच्चे आणि भोसरीतील विकास डोळस, वैशाली खाड्ये यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. पिंपरी मतदारसंघाला सरचिटणीसपद न दिल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली. या नाराजीतून माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. भोसरीतील दिनेश यादव यांच्याकडे युवा मोर्चाचे अध्यक्षपद सोपविले. वरिष्ठ उपाध्यक्षपदी काळुराम बारणे, उपाध्यक्षपदी विनायक गायकवाड, तुषार हिंगे, राम वाकडकर, अमित पसरणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू यांची नियुक्ती केली. त्यातील हिंगे यांनी राजीनामा दिला. सचिवपदी नवनाथ ढवळे, राजेंद्र बाबर, खंडूदेव कथोरे, दीपक भोंडवे, ॲड. युवराज लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजित बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध सेलचे अध्यक्षही जाहीर केले आहेत. त्याचबरोबर ८२ जणांना कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.
कार्यकारिणीत संघटना वाढविण्यासाठी ताकदीचे पदाधिकारी दिसत नाहीत. चिंचवड, भोसरीत सरचिटणीसपद दिले. पण, पिंपरीला डावलले आहे. पिंपरीत संघटना बळकट करण्यासाठी सरचिटणीसपद देणे गरजेचे होते. पिंपरीला डावलल्याने उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे तुषार हिंगे यांनी सांगितले.
तुषार हिंगे यांनी सरचिटणीसपद मागितले होते. हिंगे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांना प्रदेश स्तरावर न्याय देता येईल. प्रदेशने कार्यकारिणी निश्चित केली आहे, असे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले.
विविध मोर्चे आणि आघाड्यांचे प्रमुख!
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल उर्फ बापू घोलप, ओबीसी मोर्चा अध्यक्ष चेतन भुजबळ, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, कायदा आघाडी अध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, सोशल मीडिया सेल सागर बिरारी, ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष सुनील लांडगे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष विजय भिसे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष विजय शिनकर, माजी सैनिक सेल अध्यक्ष देविदास साबळे, आध्यात्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष जयंत बागल, आयुष्मान भारत सेल अध्यक्ष गोपाळ माळेकर, बेटी बचाव बेटी पढाव अध्यक्ष प्रीती कामतीकर, अभियंता सेल अध्यक्ष संतोष भालेराव, चार्टर्ड अकाउंट सेल अध्यक्ष बबन डांगले, दिव्यांग सेल अध्यक्ष अंकुश शिर्के, वैद्यकीय प्रकोष्ठ अध्यक्ष: डॉ. अमित नेमाने, गृहनिर्माण संस्था फेडरेशन प्रकोष्ठ प्रदीप बेंद्रे वकृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ हरीश मोरे, मन की बात संयोजकपदी नंदकुमार दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.