पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने रोख्यांद्वारे ४०० कोटी रुपयांचे कर्ज उभारल्यानंतर आता मोशी येथील रुग्णालय आणि पुणे-मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी ५५० कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. या कर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या सोयीसाठी मोशीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. मोशीतील गायरान जमिनीवर १५ एकर परिसरामध्ये आठ मजली ८५० खाटांचे रुग्णालय आहे. त्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी एकूण ७५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ती इमारत पर्यावरणपूरक व हरित संकल्पनेवर आधारित आहे.
तसेच, दापोडी ते निगडी मार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’चे काम केले जात आहे. त्यासाठी १७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही कामांसाठी महापालिका ५५० कोटी रुपयांचे कर्ज काढणार आहे. त्याची नोटीस महापालिकेने डिसेंबर २०२३ ला प्रसिद्ध केली होती. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. महापालिकेला कर्जबाजारी करू नका, प्रशासकीय राजवटीत कर्ज घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने काहीकाळ कर्ज घेण्याची प्रक्रिया थांबविली होती. विरोध थंडावल्यानंतर प्रशासनाने कर्जाची प्रक्रिया सुरूच ठेवली. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हे कर्ज मान्यताप्राप्त राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेण्यात येणार आहे.
नदी सुधार, हरित सेतूसाठी कर्जरोखे
पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. त्यासाठी महापालिकेने सन २०२३ मध्ये म्युन्सिपल बॉण्ड काढून २०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्यातून मुळा नदी सुधार प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे. निगडीत सुरू असलेल्या हरितसेतू प्रकल्पासाठी तसेच, टेल्को रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिझाइन नुसार काम करण्यासाठी २०० कोटींचे असे एकूण ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे महापालिकेने उभारले आहेत.
चौकट
नाशिक फाटा उड्डाणपुलासाठीत्या कर्जाची फेड सुरूच
महापालिकेने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात दुमजली उड्डाणपूल उभारला आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडून १५९ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज जानेवारी २०१५ मध्ये घेतले हाेते. हे कर्ज अद्याप महापालिका फेडत आहे. त्याची मुदत जानेवारी २०३९ पर्यंत आहे.
मोशी रुग्णालय आणि दापोडी ते निगडी ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’ या दोन कामासाठी महापालिका ५५० कोटी रुपयांचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेणार आहे. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेचे पत नामांकन ‘एएप्लस’ असल्याने कर्ज मिळत आहे. हे कर्ज मुख्यत्वे रुग्णालयाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका