पिंपरी : चिंचवड येथील विद्यानगर परिसरात तीन तरुणांनी कोयते आणि लोखंडी गज घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. तसेच त्यांनी एका व्यक्तीकडे खंडणीचीही मागणी केली. ही घटना सोमवारी घडली. या प्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुजल सूर्यवंशी याला अटक केली असून, त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यांच्याकडून १२०० रुपये जबरदस्तीने घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घराजवळ आले आणि ‘भाईचा बर्थडे आहे, सगळ्यांनी पैसे द्या’ असे ओरडून त्यांनी हातातील कोयते आणि लोखंडी गज हवेत फिरवत दहशत निर्माण केली. यामुळे परिसरातील लोक घाबरून घरात पळून गेले. आरोपींनी फिर्यादीच्या मोटारीच्या काचा फोडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान केले. त्यांनी इतर वाहनांचीही तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

मारुंजीत चाकूच्या धाकाने घेतली २५ हजार रुपयांची खंडणी

एका व्यक्तीचे चाकूच्या धाकावर अपहरण करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी मारुंजी येथे घडली आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सत्यवान तापकीर (२९, ताजणेमळा, चऱ्होली बुद्रुक) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी जात असताना आकाश याने त्यांना थांबवले. आकाशने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवले. त्यानंतर अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. २५ हजार रुपये खंडणी घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

आळंदीत नदीघाटावर राहणाऱ्या तरुणाला मारहाण

आळंदी येथे नदीघाटावर राहणाऱ्या एका तरुणाला ‘तू येथे राहू नकोस’ असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी घडली. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीला ‘तू आळंदी घाटावर राहू नकोस’ असे बोलून शिवीगाळ करत होता. त्यानंतर त्याने एका लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर आणि डाव्या पायावर मारहाण केली. तसेच, त्याने हाताने आणि लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमाटणे फाटा येथे घडली. हनुमंत कुचेकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुचेकर हे कामावर जात असताना एका ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी घसरून कुचेकर रस्त्यावर पडले. त्यांना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.