पिंपरी : एका सेवानिवृत्त व्यक्तीचा मोबाइल हॅक करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून सात लाख ७९ हजार रुपये काढून ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना संत तुकारामनगर येथे उघडकीस आली. याबाबत ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करून त्यांची सर्व माहिती मिळवली. त्यानंतर त्यांचा मोबाइल हॅक करून फिर्यादींचा मोबाइल नंबर लिंक असलेल्या बँक खात्यातून सात लाख ७९ हजार रुपये काढून घेतले. त्यांची ऑनलाइन फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली ७२ लाखांची फसवणूक

बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे एका व्यक्तीची ७२ लाख ६४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना भोसरी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. या प्रकरणात ४० वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केट आणि आयपीओसाठी फिर्यादीला एकूण ७२ लाख ६४ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. गुंतवणुकीच्या रक्कमेवर दोन कोटी ४६ लाख रुपये एवढा नफा दाखवला गेला. मात्र, गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्यासाठी एकूण जमा रकमेच्या १२ टक्के शुल्काची मागणी करण्यात आली. रक्कम परत न करता फिर्यादीची ७२ लाख ६४ हजार रुपये किमतीची आर्थिक फसवणूक करण्यात आली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

जुन्या भांडणातून तरुणास बेल्टने मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करत बेल्टने मारहाण केली. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही दिवसांपूर्वी गैरसमजातून वाद झाले होते. आरोपीने धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून शिवीगाळ केली. एकाने फिर्यादीचा हात धरला आणि दोघांनी डोक्यात बेल्टने मारहाण केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

तरुणाला मारहाण

ट्रिपलसीट जात असताना कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी एका तरुणाला शिवीगाळ केली आणि दांडक्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. या प्रकरणात एका व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरुन ट्रिपलसीट येत होते. त्यांनी फिर्यादी यांना कट मारल्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. आरोपीने त्यांची गच्ची पकडली. दांडक्याने डोक्यात मारले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

जुनी सांगवी येथे सांगवी पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले आहे. ही कारवाई सायंकाळी औंध जिल्हा रुग्णालयाच्या समोर करण्यात आली. प्रेम किसन चव्हाण (२१, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक निशांत काळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध जिल्हा रुग्णालयाजवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून प्रेम चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस आढळून आले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

जुगार खेळणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा

चिंचवड येथे एका मोकळ्या जागेत पैशावर तीन पत्त्यांचा जुगार खेळताना चार आरोपींना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई चिंचवड येथे करण्यात आली. या प्रकरणात पोलीस शिपाई दत्तु पाटेकर यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पैशावर तीन पत्त्याचा जुगार खेळ खेळत होते. या जुगार अड्ड्याबाबत संत तुकाराम नगर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चौघांना ताब्यात घेळते. त्यांच्याकडून ५२ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.