पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या कार्यकारिणीवर घराणेशाहीचे वर्चस्व दिसून येत आहे. एकाच घरात दाेन-दाेन पदे देण्यात आली असून १९१ जणांची जम्बाे कार्यकारिणी शहराध्यक्ष याेगेश बहल यांनी साेमवारी जाहीर केली आहे.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना मुख्य समन्वयक करण्यात आले आहे. त्यांचे पुत्र माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांना कार्याध्यक्ष, लांडे यांचे जवळचे नातेवाईक अजित गव्हाणे यांना मुख्य प्रवक्ते करण्यात आले आहे. अजित पवार यांच्यावर टीकेचे बाण साेडत चिंचवडमधून अपक्ष विधानसभा निवडणूक लढविलेल्या भाऊसाहेब भाेईर यांना मुख्य संघटक करण्यात आले आहे. नाना काटे यांच्याकडेही मुख्य संघटक पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

माजी नगरसेवक संताेष बारणे यांना कार्याध्यक्ष तर त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका माया बारणे यांना चिंचवड विधानसभा संघटिका करण्यात आले आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे यांच्याकडे पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या संघटिकापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक विनायक रणसुभे यांच्याकडे मुख्य सरचिटणीस, माजी महापाैर मंगला कदम यांना महिला मुख्य संघटिका करण्यात आले आहे. माजी नगरसेविका वैशाली काळभाेर आणि अपर्णा डाेके यांना विधानसभा संघटिका आणि शहर उपाध्यक्ष अशी दोन पदे देण्यात आली आहेत.

या कार्यकारणीत नऊ कार्याध्यक्ष, पिंपरी, चिंचवड, भाेसरी असे विधानसभा अध्यक्ष, तीन संघटक, तर एका विधानसभा मतदार संघासाठी तीन महिलांची संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल ४३ जणांना उपाध्यक्ष केले आहे. ३४ जणांना शहर सरचिटणीसपद दिले आहे. २३ जणांना शहर चिटणीस पद दिले आहे. महिला, युवक, विद्यार्थी, युवती पूर्वीचेच कायम ठेवले आहेत.

दाेन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास फायदा

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विभाजनाचा विरोधकांना फायदा हाेईल. दाेन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढविण्याचे संकेत आमदार राेहित पवार यांनी दिले आहेत. त्याला आमचीही हरकत नाही. दाेघांनी एकत्र निवडणूक लढविल्यास फायदाच हाेईल, असे शहराध्यक्ष याेगेश बहल यांनी सांगितले.

अजित पवारांच्या स्वीय सहायकाच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शहर कार्यकारिणीला एका वर्षांने मुहूर्त मिळाला आहे. ही कार्यकारिणी जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनील मुसळे उपस्थित होते.

कार्यकारिणीत सर्व समाजातील कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. महायुती स्वबळावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्वबळावरच लढावे अशी आमची भूमिका आहे. शहराचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी व्यक्त केला.