लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी २६, २७ व २८ मे ला परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, न्यायालय लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गासाठी रिक्त असलेल्या ३८८ जागांसाठी अर्ज मागविले होते. राज्यभरातून ८५ हजार ७७१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. २६ मे रोजी एका सत्रामध्ये, २७ मे रोजी तीन सत्रामध्ये तर २८ मे रोजी तीन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे.

आणखी वाचा-नृत्यांगना गौतमी पाटीलच्या दिलखेच अदांनी पिंपरी-चिंचवडकर घायाळ!

राज्यभरातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी महापालिकेने सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सह शहर अभियंता यांच्यासह तब्बल ९८ वरिष्ठ अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रावर निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परिक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर लावण्यात आले आहे. तसेच केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही, स्कॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्तांना आवश्‍यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार दिव्यांगाकरिता आवश्‍यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महापालिका भरतीच्या परीक्षेची तारीख एकच आली आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरळसेवा भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने आयोजित केली जाणार असल्याने कुठल्याही आमिषाला, गैरप्रकाराला बळी पडू नये. प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवळी जाहीर निवेदन, सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. परीक्षा कालावधीत सामान्य प्रशासन विभाग मध्यवर्ती कक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. या कक्षाचा फोन क्रमांक पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. -विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग