पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील दहा दिवसांत शहराच्या विविध भागांतील १२ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असल्याचे महापालिकेने सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात गाई, म्हशी, बैल, घाेडे, उंट यासह पाळीव जनावरांची संख्या दाेन हजार ४०० आहे. जनावरांना लम्पी रोगाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.
लम्पी आजार हा ‘कॅप्रीपॉक्स’ विषाणूमुळे होतो. त्यामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप येतो. डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येतो. चारा खाणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते. काही जनावरांत पायावर सूज येणे आणि लंगडणे, असे प्रकार घडतात. डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यामुळे हा आजार फैलावतो. त्यामुळे पशुपालकांनी चारा कमी खाणाऱ्या जनावरांची तपासणी करून घ्यावी. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरात दहा दिवसांत १२ जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पथक नियुक्त करण्यात आले ओह. राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने दीड हजार लसीचे डाेस उपलब्ध झाले आहेत. – संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड