पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी ते दापोडी पूल या रेल्वे मार्गाच्या एका बाजूने १८ मीटर विकास आराखड्यातील (डीपी) रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी या तीन भागांसाठी पर्यायी अंतर्गत रस्ता उपलब्ध होणार असल्याने परिसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक फाटा, कासारवाडी पूल ते दापोडी पुलापर्यंत रेल्वे मार्गाच्या बाजूने १८ मीटर रुंद रस्त्याचे महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षण आहे. तो महापालिकेकडून विकसित करण्यात येणार आहे. कासारवाडी ते दापोडीच्या हॅरिस पूल या मार्गाचे अंतर २.५० किलोमीटर आहे. वाढती वाहतूक, रहदारी लक्षात घेऊन हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी भागांतील रहिवाशांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. दापोडी ते निगडी या समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) मार्गाच्या विरुद्ध बाजूने हा समांतर रस्ता असणार आहे. हा रस्ता लोकवस्तीतून जाणार आहे. या रस्त्यामुळे दापोडी ते निगडी मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
स्थायी समितीची मान्यता
स्थापत्य विभागाने सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करून दर मागविण्यात आले होते. त्यात आठ सल्लागारांनी सहभाग घेतला. त्यांपैकी चार सल्लागारांनी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या दालनात सादरीकरण केले. सर्व सल्लागारांनी तांत्रिक प्रस्ताव जुलैला सादर केले. तांत्रिक छाननीमध्ये तीन सल्लागार पात्र ठरले. त्यातील सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेला निविदापूर्व ०.५० टक्के आणि निविदापश्चात १.१८ टक्के असे एकूण १.६८ टक्के शुल्क दिले जाणार आहे. संस्थेच्या नियुक्तीस, तसेच खर्चास आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.
कासारवाडी पूल येथील हिराबाई लांडगे चाळ ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत रेल्वे मार्गाच्या एका बाजूने काही ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्ता ताब्यात घेणे बाकी आहे. हा रस्ता फुगेवाडी स्मशानमूभी येथून निघतो. या २.५० किलामीटर अंतराचा १८ मीटर रुंदीचा डीपी रस्ता तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांनी सांगितले.
