पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षातील (२०२५-२६) पहिल्या सहामहीत ६०७ काेटींचा मिळकत कर वसूल केला आहे. चार लाख ७८ हजार २६८ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला. वाकड भागातून सर्वाधिक ७६ कोटी ४१ लाख, तर सर्वांत कमी पिंपरीनगर विभागीय कार्यालयातून चार कोटी ९२ लाखांचा कर वसूल झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सात लाख ३५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग कर वसूल करत आहे. एक एप्रिल ते ३० जूनपर्यंत मिळकत कर भरल्यास सामान्य करात दहा टक्के सवलत देण्यात आली.
पहिल्या तीन महिन्यांत ३० जूनपर्यंत ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत देयक भरल्यास सामान्य करात चार टक्के सवलत देण्यात आली. त्यात ३० सप्टेंबरपर्यंत एकूण ६०६ कोटी ८२ लाखांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांत केवळ ८४ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला.
अडीच लाख मालमत्ता करकक्षेत
शहरातील नोंद नसलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्ता शोधण्यासाठी महापालिकेने खासगी संस्थेमार्फत ड्रोन सर्वेक्षण केले. या संस्थेने अडीच लाखांपेक्षा अधिक नोंद नसलेल्या व वाढीव बांधकाम केलेल्या मालमत्तांचा शोध घेतला आहे. या मिळकत कर कक्षेत आणल्या असून, या मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्यात येत आहे. परिणामी, करात भर पडत आहे.
ऑनलाइन माध्यमातून ४३५ कोटींचा भरणा
घरबसल्या ऑनलाइन कर भरण्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. तीन लाख ७० हजार ८६५ मालमत्ताधारकांनी ४३५ कोटी ६७ लाखांचा ऑनलाइन भरणा केला. रोखीत ४० कोटी ८३ लाख, धनादेशाद्वारे ३३ कोटी ४७ लाख, आरटीसीएसद्वारे २५ कोटी ५७ लाख, विविध ॲपच्या माध्यमातून १९ कोटी ३४ लाख, एनईएफटीतून १६ कोटी ६६ लाख आणि धनाकर्षाद्वारे दोन कोटींचा कर वसूल झाल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
सहा महिन्यांत ४४३ कोटी वसुलीचे उदि्दष्ट
कर संकलन विभागाला यंदा एक हजार ५० कोटी रुपये वसुलीचे उदि्दष्ट दिले आहे. पहिल्या सहा महिन्यांत ६०७ कोटी रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत. पुढील सहा महिन्यांत ४४३ कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे.
मिळकत करांची देयके महिला बचत गटामार्फत वितरित करण्यात आली. महिलांनी शंभर टक्के देयकांचे वाटप केले. त्यामुळे पहिल्या सहामाहीत विविध कर सवलतींचा लाभ घेत नागरिकांनी कराचा भरणा केला आहे. मोठी थकबाकी असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.