पिंपरी : सायबर फसवणुकीला सर्वाधिक आयटी अभियंते बळी पडत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना सर्व गोष्टींची माहिती असून देखील केवळ पैशांच्या हव्यासापोटी अनेक आयटी अभियंते फसवणुकीचे बळी ठरत आहेतहे. डिजिटल अटकेच्या फसवणुकीत ज्येष्ठ नागरिक अडकत आहेत. डिजिटल अटक अशी कोणतीही संकल्पना कायद्यात अस्तित्वात नाही. सायबर गुन्हेगार नागरिकांना आमिष आणि भीती या दोन भावनांच्या आधारे आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले. डिजिटल युगात वावरताना सतर्क राहून सायबर गुन्ह्यांचा धोका टाळता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सायबर सुरक्षेबाबत नागरिकांशी ऑनलाईन माध्यमातून मंगळवारी संवाद साधला. यामध्ये शाळा, महाविद्यालये, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, उतपादन करणाऱ्या कंपन्या, ज्येष्ठ नागरिक, हाऊसिंग सोसायट्यांमधील १२ हजार प्रतिनिधी, तर ३३ हजार ८४४ नागरिकांची ऑनलाइन हजेरी अशा ४५ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उपस्थिती लावली. नागरिकांच्या सर्व प्रश्नांना आयुक्तांनी ऑनलाइन उत्तरे दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात शैक्षणिक संस्था वाढत असून या संस्थांमधून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. या विद्यार्थ्यांची नोकरी आणि कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) बाबत खोटे संदेश, लिंक पाठवून फसवणूक होते. त्याबाबत सुरज शर्मा यांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आयुक्त चौबे म्हणाले, नोकरी संदर्भातील माहितीसाठी संबंधित कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. नोकरीची ऑफर देणार्या इ-मेलचे डोमेन नेम काय आहे, हे तपासावे. महत्वाच्या कंपन्या कधीही नोंदणी अथवा नोकरीसाठी पैसे घेत नाहीत. महाविद्यालयाच्या विभागाकडून नोकरीच्या ऑफर मेलची खात्री करून घ्यावी.
खात्री केल्याशिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये. ऑनलाइन व्यवहार सुरक्षित कसे करावेत, याबाबत मयंक लढ्ढा यांनी विचारलेल्या प्रश्नावर आयुक्त म्हणाले, पैसे देण्यासाठी सार्वजनिक वायफाय वापरणे टाळावे. ऑनलाइन पैसे देताना कुठेही कार्डची माहिती जतन करून ठेऊ नका. पेमेंटसाठी वापरला जाणारा पासवर्ड मजबूत असावा. सीव्हीव्ही आणि ओटीपी शेअर न करण्याचा सल्ला आयुक्तांनी दिला. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केलेल्या अनेक उल्लेखनीय कामगिरींबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच, सायबर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
कर्ज देणाऱ्या ॲपपासून सावधान
प्ले स्टोअर, ॲपल ॲप स्टोअर वरून कोणतेही कर्ज देणारे ॲप डाउनलोड करताना त्याखाली दिलेले मत (रिव्ह्यू), किती लोकांनी डाउनलोड केले आहे, अप्लिकेशन इन्स्टॉल करताना गोपनीय विदाची परवानगी मागत आहे का, हे पाहणे आवश्यक आहे. कोणतेही अधिकृत ॲप अशी परवानगी मागत नाही. तसेच, त्या ॲपची माहिती संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर असते. ॲप डाउनलोड करताना गोपनीय माहिती मिळवली जाते. त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे भीती घालून पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे असे कोणतेही ॲप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला.
