पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बाल गुन्हेगारी डोकं वर काढत आहे. वाहनांची तोडफोड, मारामारी, यासह मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्येदेखील अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग आहे. मुलांना योग्य वेळी योग्य दिशा मिळावी म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हेगारीच्या दिशेने वळणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विधीसंघर्षित बालकांना फुटबॉल खेळण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी संदेश बोर्डे हे शहरातील १८ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४०० पेक्षा अधिक मुलांना फुटबॉल खेळण्याचे प्रशिक्षण देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाल गुन्हेगारीमध्ये सात ते आठ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिली.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेल्या अनेक वर्षांपासून बाल गुन्हेगारी ही पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेली आहे. बाल गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आता पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दिशा’ उपक्रम राबवला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिशा उपक्रमाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जात आहे. शहरात ७८ झोपडपट्टी असून या ठिकाणी वावरत असलेल्या अठरा वर्षांखालील मुलांना हे फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारीच्या दिशेने वळणारे आणि चांगल्या मुलांचा या फुटबॉल प्रशिक्षणात सहभाग आहे.
हेही वाचा – उमेदवारीवरून पुणे काँग्रेसमध्ये चलबिचल !
अनेकदा प्रश्न पडतो की, भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असताना फुटबॉलची निवड का? करण्यात आली. यावर प्रश्नावर प्रशिक्षक संदेश बोर्डे म्हणाले, फुटबॉल हा असा एक खेळ आहे जो प्रत्येक खेळाडू त्या बॉल मागे धावतो आणि तुम्हाला शारीरिक श्रम करायला लावतो. क्रिकेटमध्ये मात्र तसं नाही. जेव्हा तुमच्याकडे बॉल येतो तेव्हाच तुम्हाला धावावे लागते. क्रिकेट महागडा खेळदेखील असून फुटबॉलमध्ये केवळ एक बॉल असतो. शूज प्रत्येक मुलाकडे असतो, असं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, गुन्हेगारी दिशेने वळणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षित बालकांच्या डोक्यात गुन्ह्यागारीविषयी काही विचार येत नाहीत. एक विधीसंघर्षित बालक स्वतः फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहे. तो आधी काही मुलांनाबरोबर घेऊन हप्ते मागायचा, अनेकांना मारहाण करायचा, मात्र आता तो गुन्हेगारीवृत्ती सोडून एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर तो महाविद्यालयीन शिक्षणदेखील घेत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या उपक्रमाचं कौतुक नक्कीच आहे. आज दिशा पॅटर्न इतर ठिकाणीदेखील राबवण्याची गरज आहे.