पिंपरी- चिंचवड: दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी विरोधी पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश आहे. तसेच राजकीय नेत्यांचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. ही कारवाई ३० ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई दादाभाऊ नंदाराम साबळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
दिघी पोलिसांनी या प्रकरणात २७ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणांमध्ये गणेश विठ्ठल लांडगे या सराईत गुन्हेगाराचा देखील समावेश आहे. कारवाईत ३४ लाख १४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुर्डेवस्ती रासकर नावाच्या व्यक्तीच्या खोलीमध्ये केतन जोरे हा जुगार अड्डा चालत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार रात्री उशिरा खंडणी विरोधी पथकाने चऱ्होली येथील बुर्डेवस्ती येथे जुगार सुरू असलेल्या खोलीवर छापा टाकून त्या ठिकाणी उपस्थित असलेले ३३ जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांचा छापा पडताच काही जणांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी २७ जणांना अटक केली आहे. यामध्ये सराईत गुन्हेगार गणेश विठ्ठल लांडगे याचा समावेश असून त्याला अटक करण्यात आली आहे. या जुगार अड्ड्यात काही राजकीय कनेक्शन जुळत असल्याचं बोललं जात आहे. याचा देखील तपास पोलीस करत आहेत. ३४ लाख १४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.