पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक उभारण्यात आले आहेत. या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या अनधिकृत फलकांवर तत्काळ कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिला आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आयुक्त हर्डीकर यांनी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार या वेळी उपस्थित होते.
हर्डीकर म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी प्रभागांतील चौक, वर्दळीच्या जागी विनापरवाना फलक लावले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप बनले आहे. सर्व प्रभागांनी विशेष मोहीम राबवावी. विनापरवाना उभारलेले फलक, होर्डिंग तातडीने हटविण्यात यावेत. सार्वजनिक सुरक्षेला धोका, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फलकांवर तत्काळ कारवाई करावी. परवानाधारक होर्डिंगची माहिती अद्ययावत ठेवावी. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढवावे.’
बीआरटी थांब्यांवरील जाहिराती काढून टाका
पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बसथांब्यांवर उभारण्यात आलेल्या जाहिरात होर्डिंगच्या परवान्याची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतरदेखील संबंधित ठेकेदार संस्थेकडून बसथांब्यावर अनधिकृतपणे जाहिराती लावल्या जात आहेत. त्यामुळे बीआरटीएस मार्गावरील बस थांब्यावरील जाहिरात होर्डिंग काढावेत, अशी सूचना पीएमपी प्रशासनाने महापालिकेला केली आहे.
तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करा
निवडणुकीच्या तयारीनिमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांच्या नेमणुका, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान यंत्रांची सुरक्षितता, मतदारयादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदारयादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देशही आयुक्त हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रस्ते खड्डेमुक्त करा
शहरातील दैनंदिन सेवा, स्वच्छता व्यवस्था, शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती आयुक्तांनी घेतली. विनापरवाना रस्ते प्रकाशयोजना, पाणीपुरवठ्याच्या कामाला गती द्यावी. शहरातील रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. तत्काळ खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचनाही आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या आहेत.
शहरातील बीआरटी बसथांब्यावर पीएमपीकडून निविदाप्रक्रिया राबवून जाहिरात संस्था नियुक्त केली होती. परवान्याची मुदत संपली आहे. त्यामुळे होर्डिंग हटविण्याचे पीएमपी प्रशासनाचे पत्र महापालिकेला मिळाले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. – राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.
