पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी आज (गुरुवारी) शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राचाही दुरुस्तीसाठी आज सकाळपासून पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे शहराचा आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) या दाेन दिवसांत पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात स्थापत्य व विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच, क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युतविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आज गुरुवार (१२ जून) जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१३ जून) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. नागरिकांनी महापालिकेच्या उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत आणि यांत्रिकी विभागामार्फत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी आज गुरुवार (१२ जून) सकाळपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तो रात्री बारापर्यंत बंद राहील. या कामामुळे शुक्रवारी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीमएई, दिघी, व्हीएसएनएल, कटक मंडळ, ओएफडीआर या भागातील नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करावा, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.