पिंपरी-चिंचवडच्या खिंवसरा जलतरण तलावात बुडून शहबाज शाहिद खान या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. पोहत असताना त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला बाहेर काढलं. तातडीने शहबाजला थेरगाव येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जीवरक्षकांनी त्याला लवकर पाहिलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असं प्रत्यक्षदर्शीचे म्हणणं आहे.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने कंत्राट पद्धतीवर महानगरपालिकेचे सर्वच जलतरण तलाव दिलेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी हे कंत्राटदार लक्ष देत नाहीत. उन्हाळी सुट्टी असल्याने शेकडो मुलं पोहणे शिकण्यासाठी महानगरपालिकेच्या जलतरण तलावाला पसंती देतात. हे खासगी कंत्राटदार मनमानी करत एक महिन्याची दोन ते तीन हजार रुपये ‘फी’ आकारतात. मुलं पोहणं शिकत असताना त्या ठिकाणी पुरेशी यंत्रणा असणे देखील गरजेचे आहे. जीवरक्षक असणे गरजेचे आहेत. एका बॅचमध्ये भरमसाठ मुले भरून आपला फायदा बघणाऱ्या या कंत्राटदारांवर महानगरपालिकेचा जरब असणं गरजेचे आहे. परंतु, तसं दिसत नाही. याप्रकरणी वाकड पोलीस कुणावर गुन्हा दाखल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथं चार जीवरक्षक तैनात होते. ‘त्या’ तरुणाला तातडीने बाहेर काढण्यात आलं. सीपीआर देण्यात आला. तरुणाला उलटी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तो मुलगा कालपासून पोहायला येत होता” – पंकज पाटील, उपायुक्त क्रीडा विभाग