सर्वपक्षीय नगरसेवकांची पाठ

पिंपरी : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, शहराचा नावलौकिक वाढवणाऱ्या गुणवंतांची माहिती एकत्र करून त्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम राबवण्याची घोषणा महापौर माई ढोरे यांनी वर्षभरापूर्वी केली. त्यानुसार, नगरसेवकांनी आपापल्या परिसरातील २० मान्यवरांची माहिती देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने एकही नाव महापौरांना प्राप्त झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, कामगार, शैक्षणिक, सहकार, राजकीय, वैद्यकीय, पर्यावरण, संरक्षण, माजी सैनिक, पोलीस आदी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती एकत्रित करण्याची सूचना महापौरांनी वर्षभरापूर्वी एका पत्राद्वारे नगरसेवकांना केली होती. मुख्यत्वे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, माजी सनदी अधिकारी, एखाद्या क्षेत्रातील दिग्गज अशी शहरभरातील प्रतिष्ठितांची नावे महापौरांना अपेक्षित होती. एका नगरसेवकाने किमान २० मान्यवरांची नावे तपशिलासह द्यावीत अशा सूचनाही होत्या. याबाबतची अंतिम यादी तयार करून क्रमाने त्यांना पालिकेच्या विविध कार्यक्रमात आमंत्रित करण्याचे नियोजन होते. या माध्यमातून त्यांच्या कार्याचाही गौरव करण्यात येणार होता. मात्र, गेल्या वर्षभरात एकाही नगरसेवकाकडून, एकही नाव महापौरांकडे आलेले नाही. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, टाळेबंदी यामुळे ही नावे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. सर्व सुरळीत झाल्यानंतर या उपक्रमाचे पुन्हा नियोजन करण्यात येईल, अशी सारवासारव महापौर कार्यालयाकडून करण्यात आली.

शहरभरातील गुणवंतांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे, हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे तो गुंडाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा विषय मागे पडला आहे. मात्र, वातावरण निवळल्याचे दिसू लागल्यानंतर निश्चितपणे याचे नव्याने नियोजन करू.

– माई ढोरे, महापौर, पिंपरी -चिंचवड

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri mayors quality search initiative wrapped ssh
First published on: 15-06-2021 at 00:27 IST