पिंपरी : आकुर्डीमधील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळ्यांसाठीचे भाडेदर जास्त ठेवल्याने व्यापारी, व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरवल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने दर कमी करून हे ५० गाळे शहरातील नाेंदणीकृत महिला, दिव्यांग बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-लिलाव पद्धतीने या गाळ्यांचे वाटप हाेणार आहे. त्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

आकुर्डी परिसरातील रेल्वे स्थानक, प्रमुख रस्ता, वर्दळीचा परिसर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मोक्याच्या जागी शहरातील होतकरू तरुण आणि महिला उद्योजकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ५० व्यावसायिक गाळे उभारले. त्यासाठी चार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या गाळ्यांची निविदा डिसेंबर २०२२ मध्ये काढण्यात आली होती. तीन महिन्यांत गाळे उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, या गाळ्यांचे काम दीड वर्षानंतर पूर्ण झाले. बांधकाम व विद्युत विभागाने काम पूर्ण झाल्यानंतर भूमी व जिंदगी विभागाकडे हे गाळे वर्ग केले आहेत.

गाळ्यांचा भाडेदर निश्चित करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. नगररचना विभागाकडील मूल्यांकनानुसार आकुर्डीतील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळ्यासाठी दहा वर्षांसाठी ७४ लाख, तर मासिक भाडे ९२ हजार रुपये इतके निश्चित केले. हे दर अवाजवी असल्यामुळे महापालिकेच्या सोडतीकडे व्यापारी, व्यावसायिकांनी पाठ फिरवली. प्रतिसादच मिळत नसल्यामुळे मागील दीड वर्षांपासून हे गाळे धूळखात पडून हाेते. त्यामुळे आता समाज विकास विभागाने महिला व बालकल्याण याेजनेअंतर्गत आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळे शहरातील नाेंदणीकृत महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, करोना योद्धा, आदिवासी बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुकांना २६ सप्टेंबरपर्यंत महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

आकुर्डीमधील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळ्यांचा भाडेदर कमी केला आहे. गाळे महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, करोना योद्धा, आदिवासी बचत गटांना देण्यात येणार आहे. गाळ्यांचे वाटप ई-लिलाव पद्धतीने हाेणार आहे. या माध्यमातून महिला, अपंगांचे आर्थिक सबलीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. – ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका