पिंपरी : महापालिकेच्या वतीने महिला सबलीकरणासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके ३०० महिलांच्या मार्फत वाटण्यास प्रारंभ केला आहे. देयके घेऊन आलेल्या महिलांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.

पिंपरी- चिंचवड शहरात पाच लाख ९७ हजार ७८५ मालमत्ता आहेत. करआकारणी व करसंकलन विभागाने देयकांची छपाई केली आहे. बचत गटाच्या महिलांना सोमवारी (दि. २४) प्रशिक्षण दिले. महिलांना मालमत्ता कराच्या देयकाची, नागरिकांची कोणती माहिती भरून घ्यायची त्या विषयी माहिती देण्यात आली. देयके वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी योग्य नियोजन करून महिलांना ओळखपत्रेही देण्यात आली आहेत. देयकांचे वाटप सुरू केले आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रुपीकरण करणारे जाहिरात फलक काढा, श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

करसंकलन विभागाच्या ॲपद्वारे महिला माहितीचे संकलन करणार आहेत. मालमत्ताधारकांचा संपर्क क्रमांक, पत्ता नव्याने समाविष्ट करता येणार आहे. मालमत्तेचे अक्षांश व रेखांश मिळाल्याने मालमत्ता शोधणे सोपे जाणार आहे. प्रत्येक मालमत्तेचे छायाचित्र घेता येणार. त्यामुळे मालमत्तेची माहिती परिपूर्ण होण्यास मदत होईल. अद्ययावत माहितीचा फायदा करसंकलन विभागास पुढील काळात वसुली, देयके वाटपास होणार आहे. दरम्यान, मालमत्ताकराच्या देयकावर नाव, मोबाइल क्रमांक बरोबर आहे का, याची खातरजमा करावी. दुसरा मोबाइल क्रमांक किंवा संपर्काचा वेगळा पत्ता द्यायचा असेल, तर तो देखील देता येणार आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : काम दिले जात नसल्याने पीएमपीएमएलच्या कंत्राटी बस चालकाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी पोलिसांना केला होता फोन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालमत्ताकराच्या देयकांचे वेगाने वाटप होण्यासह सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी सिद्धी उपक्रम हाती घेतला आहे. महिला अतिशय उत्तम प्रकारे हा उपक्रम यशस्वी करतील, असा विश्वास असल्यानेच हे काम महिला बचत गटांना दिले. महिलांना ओळखपत्र दिले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी महिलांचे ओळखपत्र आणि देयके पाहून सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा.

– शेखर सिंह आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका