पिंपरी : मागील नऊ वर्षांपासून नूतनीकरण, सुशोभिकरणाच्या नावाखाली बंद असलेल्या चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील सर्पांसाठी पांढरे उंदीर खरेदी करण्यात येणार आहेत. एका उंदराची किंमत १५९ रुपये आहे. दोन वर्षे उंदीर घेतले जाणार असून, त्यासाठी नऊ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पशु-पक्ष्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेमध्ये १९८९ मध्ये निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय उभारले. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे २०१६ ला सुरुवात झाली. गेल्या नऊ वर्षांपासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. संग्रहालयावर आतापर्यंत दाेन टप्प्यात २० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता नव्याने २४ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. त्यासाठी प्राणिसंग्रहालय आणखी दीड वर्षे बंद राहणार आहे.

या प्राणिसंग्रहालयातील सर्पांसाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पांढरे उंदीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने निविदा काढली होती. त्यात तीन पुरवठादारांनी सहभाग घेतला. सॅम एन्टरप्रायजेस या पुरवठादाराने एका पांढऱ्या उंदराचा दर १५९ रुपये दिला. ही लघुत्तम निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या उंदरांचा आवश्यकतेनुसार दोन वर्षे पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ लाख ६१ हजार ८४० रूपये खर्च केला जाणार आहे.

पांढरे उंदीर हे खाण्यायोग्य व निश्चित केलेल्या वजनाचे असावेत. त्याचा नियमितपणे पुरवठा करावा, असे बंधन पुरवठादारावर असणार आहे. पांढरे उंदीर खरेदीच्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राणिसंग्रहालयाची सद्य:स्थिती

  • एकूण ५२ सर्प
  • आठवड्यातून एक किंवा दोन उंदीर खाद्य
  • १५९ रुपयांना एक पांढरा उंदीर
  • दोन वर्षे पुरवठा
  • खर्च आठ लाख ६१ हजार ८४० रुपये

प्राणिसंग्रहालय बंद असले तरी, त्यात विविध जातीचे ५२ सर्प आहेत. त्याची देखभाल करण्यासाठी ‘ॲनिमल किपर’ नेमले आहेत. सर्पांना आठवड्यातून एक किंवा दोन पांढरे उंदीर खाद्य म्हणून दिले जातात, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.