पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) वाकड येथील १५ एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. या जागेचा आगाऊ ताबा शुक्रवारी पोलिसांना मिळाला आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने, गुन्हे शाखेची कार्यालयांसह इतर सुविधा होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेला सहा वर्षपूर्ण झाल्यानंतरही आयुक्त कार्यालय, पोलीस अधिका-यांची निवासस्थाने, पोलीस विभागाचे मुख्यालय व इतर अनुषंगीक कार्यालये यांना स्वतंत्र जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना अडचणी निर्माण होत होत्या. आयुक्त विनयकुमार चौबे यांनी डिसेबर २०२२ मध्ये पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर ही बाब विचारात घेऊन आयुक्तालयासाठी अत्यावश्यक असणाऱ्या जागा प्राप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागांचा शोध सुरु झाला होता. पीएमआरडीएच्या ताब्यात असणाऱ्या वाकड येथील भूखंडावरील १५ एकर जागा मिळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला. पीएमआरडीएने हा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठवला होता. त्यानुसार पाठपुरावा करून जागा ताब्यात घेतली.

हेही वाचा – केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर भाष्य; म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांना पर्याय…’

हेही वाचा – लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध कार्यालये उभारणार

१५ एकर जागेमध्ये पोलीस उपआयुक्त (परिमंडळ दोन) कार्यालय, गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक कार्यालय, खंडणी विरोधी पथक कार्यालय, वाहतूक विभाग तसेच इतर अनुषंगीक कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय या जागेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बहुउद्देशीय हॉल, चालण्यासाठी मार्ग (जॉगिंग ट्रॅक), मुलांसाठी खेळाचे मैदान इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त ते सहायक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची निवासस्थाने उभारली जाणार आहेत.