टाटा मोटर्स कंपनीच्या कार विभागातील (कार प्लांट) कामगारांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून तीव्र असंतोष आहे. वेतनवाढ करारातील तरतुदी आणि जेवण व नाष्ट्याच्या वेळेतील बदल, यासह इतर कारणास्तव कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या चहा, नाश्ता आणि जेवणावर दोन हजारांहून अधिक कामगारांनी बहिष्कार घातला आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी कंपनीत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, त्या निष्फळ ठरल्या आहेत.

नाराजीची तीव्रता खूपच जास्त –

टाटा मोटर्सच्या कामगारांचा व्यवस्थापनाशी ३ मे २०२२ रोजी वेतनवाढ करार झाला. दर तीन वर्षांनी करार होण्याची ४० वर्षांची परंपरा यंदा खंडीत झाली. यंदापासून तो दर चार वर्षानंतर होणार आहे. हा बदल कामगारांना मान्य नव्हता. आमचा विरोध असतानाही संघटनेने तो मान्य केल्याची कामगारांची तक्रार आहे. कंपनीतील इतर विभागांचा वेतनवाढ करार झाला. त्याचपध्दतीने कार विभागाचा करार न झाल्याने असंतोष असतानाच, कामगारांच्या नाश्ता, चहासाठीची पूर्वीची वेळ बदलण्यात आली. त्यावरून नाराजीत भरच पडली. परिणामी, कामगारांनी सुरूवातीला चहा, नाष्टा व नंतर जेवणावर बहिष्कार घातला. प्रारंभी नाराज कामगारांची संख्या मर्यादित होती. पुढे ती वाढत गेली. सध्या दोन हजारांच्या पुढे कामगारांनी बहिष्कार घातला आहे. त्यामुळे संघटना प्रतिनिधींकडून कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, नाराजीची तीव्रता खूपच जास्त असल्याने कामगारांकडून प्रतिसाद मिळत नाही.

पुणे : पुरंदर विमानतळाचे काम ठप्पच; नव्या सरकारकडूनही प्रकल्पाबाबत हालचाली नाहीत

जवळपास सहा ते सात तास या बैठका मात्र तोडगा नाही –

कामगारांचा अंतर्गत विषय म्हणून व्यवस्थापनाने या वादापासून स्वत:ला दूर ठेवले होते. तथापि, वाद वाढतच असल्याचे पाहून व्यवस्थापनाने लक्ष घातले. गेल्या शुक्रवारपासून व्यवस्थापनातील अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांच्यात सतत बैठका होत आहेत. जवळपास सहा ते सात तास या बैठका होतात. मात्र, त्या चर्चेतून काहीही निष्पन्न होताना दिसत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहिष्कार मागे घेण्याचे व्यवस्थापनाकडून आवाहन –

कंपनीचे कामकाज विस्कळीत होण्याबरोबर कामावर परिणामही जाणवण्याची चिन्हे दिसू लागली असल्याने कामगारांनी बहिष्कार मागे घ्यावा व कामावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन व्यवस्थापनाकडून वारंवार केले जात आहे. तथापि, अपेक्षित तोडगा निघत नसल्याने कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे तूर्त तिढा कायम आहे.