पिंपरी: पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात महायुतीतील १८ माजी नगरसेवकांनी नाराजी दर्शवत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अजित पवारांच्या बंडाच्या वेळी शेवटपर्यंत साथ देणाऱ्या आमदार अण्णा बनसोडे यांना अजित पवार उमेदवारी देणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पिंपरीतील हॉटेलमध्ये महायुतीतील चारही घटक पक्षांच्या माजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी बैठक घेऊन आपली दिशा स्पष्ट केली आहे.

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला ती जागा दिली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभेत आमदार अण्णा बनसोडे यांच्या नावाची चर्चा असताना त्यांच्या उमेदवारीला महायुतीतील १८ माजी नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे. अजित पवार गटाचे काळूराम पवार, भाजपचे राजेश पिल्ले, शिंदे गटाचे जितेंद्र ननावरे आणि आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे हे चार जण पिंपरी विधानसभेतून इच्छुक आहेत. चार ही जणांसह इतर माजी नगरसेवकांनी अण्णा बनसोडे हे निष्क्रिय आमदार असून त्यांना आमदारकीची उमेदवारी देऊ नये असा ठराव केला आहे.

हेही वाचा : पिंपरीत मोठा ट्विस्ट! आमदार अण्णा बनसोडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता; शहराध्यक्षांचे सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कदाचित आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाहीत. अशी भूमिका देखील महायुतीतील चारही घटक पक्षातील माजी नगरसेवकांनी घेतली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा हेच अण्णा बनसोडे अजित पवारांच्या सोबत होते. महायुतीमधून आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध केल्यानंतर अजित पवार आमदार अण्णा बनसोडे यांना साथ देणार का? हे पाहावं लागणार आहे.