पिंपरी : ‘श्रीमंत’ पिंपरी महापालिकेचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापासूनच सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या दृष्टीने व्यूहरचना केली आहे. मात्र, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा यात मोठा अडसर आहे.
पिंपरी पालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. आतापासूनच त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून पवार झपाटय़ाने कामे पूर्ण करत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा विषय असो, की पुणे मेट्रोच्या नामकरणात पिंपरीचा समावेश असो, पवार यांनी शहरवासीयांना गोंजारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पालिकेची सत्ता टिकवण्यासाठी भाजपला पवारांशी दोन हात करायचे आहेत. त्या दृष्टीने भाजप नेतृत्वाने लक्ष्मण जगताप, महेश लांडगे या आमदारद्वयींवर विश्वास दर्शवला आहे. त्यामुळेच लांडगे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.
प्रारंभी पालिकेत काँग्रेसची एकसंध सत्ता होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर २००२ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने लढले. दोघांना जवळपास समान जागा मिळाल्याने त्यांनी एकत्र येऊन पाच वर्षे पालिकेचा कारभार केला. २००७ आणि २०१२ मध्ये राष्ट्रवादीने स्बबळावर निर्विवाद बहुमत मिळवले. २०१७ च्या निवडणुकीत मात्र पवारांच्या वर्चस्वाला धक्का देत लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी पालिका खेचून भाजपकडे आणली.
हे यश भाजप वर्तुळात कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते असे होते. मात्र, राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने पवारांना घरचा रस्ता दाखवला. त्यानंतरही, राष्ट्रवादीची घसरण कायम राहिली. मावळ लोकसभेतून पार्थ पवारांचा दारुण पराभव झाला. राजकीय पातळीवर पवारांनी सर्व काही जुळवून आणले होते. तरीही मतदारांनी पवारांची घराणेशाही नाकारून भूमिपुत्राला पसंती दिली. पालिका हातातून गेल्याने नाराज झालेले पवार मुलाच्या पराभवामुळे दुखावले होते. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचेच दोन्हीही आमदार पुन्हा निवडून आले.
जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळे पिंपरी पालिकेची सत्ता भाजपला मिळाली. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही पालिका पुन्हाजिंकू. अजित पवार ‘तात्पुरते’ सत्ताधारी आहेत. त्यांचे कसलेही आव्हान भाजपसमोर नाही. स्थानिक राजकारणात त्यांच्या हस्तक्षेपामुळे काहीही फरक पडणार नाही. – अमर साबळे, खासदार, भाजप
पिंपरीत भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. नेत्यांनीच ठेकेदारीचे दुकान उघडले आहे. त्यांची सर्व ‘प्रकरणे’ आम्ही पुराव्यासह बाहेर काढू. राष्ट्रवादीने सुरू केलेले प्रकल्प, विकासकामे थांबवण्यात आली आहेत. ते प्रकल्प पुन्हा सुरू करू. अजित पवार यांची ताकद आम्हाला उपयोगी पडणार आहे. – संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, पिंपरी राष्ट्रवादी