प्रती वर्षी ११ कोटी ५८ लाखांचा खर्च
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीसीसीडीसीएल) प्रस्तावित अॅडॉप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) प्रकल्पाचा आर्थिक भार महापालिकेला सोसावा लागणार आहे. स्मार्ट सिटीकडे निधी नसल्याने प्रकल्पाच्या उभारणीनंतरचा पुढील पाच वर्षांसाठीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रतीवर्षी ११ कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
पुणे स्मार्ट सिटीकडून एटीएमएस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत पुणे आर्णि पिंपरी-चिंचवड शहरातील सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीकडून निविदा मागिवण्यात आली होती. दिल्ली येथील विंदिया टेर्लिंलक्स प्रा. लि. या कंपनीची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी एकूण १०२ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
स्मार्ट सिटीची आर्थिक परिस्थिती फारशी सक्षम नसल्याने संपूर्ण प्रकल्पाचा खर्च करणे स्मार्ट सिटीला शक्य नाही. त्यामुळे १०२ कोटी ६२ लाखांचा भांडवली खर्च स्मार्ट सिटीकडून केला जाईल. मात्र पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा परिचालन आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेने करावा, असे पत्र स्मार्ट सिटीकडून महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाकडून ठेवण्यात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्य करण्यात आला.
प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीचा पाच वर्षांसाठीचा खर्च ५७ कोटी ९४ लाख रुपये एवढा आहे. यामध्ये काही अतिरिक्त कराचाही समावेश आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रती वर्षी महापालिका ११ कोटी ५८ लाख रुपयांचा खर्च करणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.