पिंपरी : उद्योग, कामगारनगरीतील विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रह, ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी चिंचवड येथे उभारण्यात आलेला तारांगण प्रकल्प डॉ. जयंत नारळीकर यांच्या सल्ल्यानुसार उभारण्यात आला आहे. डिजिटल, थ्रीडीपेक्षा ‘ऑप्टोमेकॅनिकल’ पद्धतीचा अवलंब करावा, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त राहील, अशा प्रकारचे तारांगण उभारावे, अशी सूचना त्यांनी केली होती. ‘सायन्स पार्क’चे संचालक प्रवीण तुपे यांनी ही आठवण सांगितली.
अंतराळ क्षेत्राची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांना या विषयात रस निर्माण व्हावा, आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वीची माहिती होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१८ मध्ये ‘सायन्स पार्क’ जवळ तारांगण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने एक समिती नेमली. या समितीचे प्रमुख डॉ. जयंत नारळीकर होते. त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार महापालिकेने तारांगण प्रकल्प निर्माण केला.
केवळ डिजिटल, थ्रीडी पद्धतीने यंत्रणा उभारू नये, अशी डॉ. नारळीकर यांनी सूचना केली होती. महापालिकेने त्यांच्या सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. ऑप्टोमेकॅनिकल पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त राहील, अशा प्रकारचे तारांगण उभारण्यात आले. त्यांच्याशिवाय बाकी कोणाचेही मत महापालिकेने विचारात घेतले नाही. तारांगणचे काम सुरू असताना डॉ. नारळीकर यांनी तीन वेळा प्रकल्पाला भेट दिली होती.
जन्मतारीख सांगितल्यानंतर त्या दिवशी आकाश कशा प्रकारचे होते हे दाखविता येते. अत्याधुनिक यंत्रणांचा अवलंब करण्यात आला आहे. वातानुकूलित असणाऱ्या या तारांगणात दीडशे जणांसाठी बैठक व्यवस्था आहे. १५ मे २०२३ पासून तारांगण प्रकल्प सुरू केला आहे. विद्यार्थी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. १५ मे २०२५ रोजी तारांगण प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
याबाबत ‘सायन्स पार्क’चे संचालक प्रवीण तुपे म्हणाले, ‘डॉ. जयंत नारळीकर यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना उपयुक्त असा तारांगण प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय बाकी कोणाचेही मत विचारात घेतले नाही. हा प्रकल्प उभारण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी तीन वेळा प्रकल्पाला भेट दिली. प्रत्येक वेळी बोलाविल्यानंतर ते कार्यक्रमासाठी येत असत. तारांगण प्रकल्पाबाबत त्यांच्या अनेक आठवणी आहेत.’