scorecardresearch

हिरवा कोपरा : रातराणी, अनंत, प्राजक्ताची सुगंधी फुले

रात्री सुगंधाची लयलूट करणारी सेस्ट्रम नॉकटरनम् रातराणी परसबागेत हवीच.

Fragrant Flowers
सुगंधासाठी लावावी, अशी तीन फुलझाडं रातराणी, अनंत अन् प्राजक्त

रंगीबेरंगी फुले, शोभिवंत पाने परसबागेत हमखास स्थान मिळवतात, पण काही वनस्पती आवर्जून लावाव्यात. केवळ सुगंधासाठी मोगरा, मदनबाण उन्हाळाभर बागेत दरवळत राहिला असेल अन त्याने तुमचा उन्हाळा सुसह्य़ केला असेल. अजूनही थोडा बहर रेंगाळला असेल. बहर संपला की मदनबाण मोगऱ्याची छाटणी करून काडय़ांपासून नवीन रोपं करावीत. रोपांची देवाणघेवाण करण्यास, भेट देण्यास उपयोगी पडतात. आता पावसाचे पाणी पिऊन जाई, जुई, सायली या फुलवेली बहरत जातील. कंदवर्गीय सोनटक्का व स्पायडर लिलीला घुमारे फुटतील अन फुलांचा गोड सुगंध दरवळत राहिल. केवळ सुगंधासाठी लावावी, अशी तीन फुलझाडं रातराणी, अनंत अन् प्राजक्त यांच्या सुगंधाचं वर्गीकरण करायचं झालं तर प्राजक्त अन् अनंत यांचा मंद सात्त्विक गंध, तर रात्रसमयी दूरवर आपले अस्तित्व जाणवून देणारा रातराणीचा मादक गंध.

रात्री सुगंधाची लयलूट करणारी सेस्ट्रम नॉकटरनम् रातराणी परसबागेत हवीच. झुडूपवजा ही वनस्पती तशी दिसायला अनाकर्षक. उगीच अस्ताव्यस्त पसरणाऱ्या फांद्या, साधीशी पाने अन् हिरवट पिवळट गुच्छात येणारी लांबट नाजूक फुले. सूर्य ढळला,रात्रीचे साम्राज्य पसरले की ही फुला सुगंध उधळतात. फुले फारशी टिकावू नाहीत. रातराणीस हिरवी, मण्यांसारखी छोटी फळे येतात. रातराणीची रोपं रोपवाटिकेत मिळतात. जमिनीत लावल्यास आठ दहा फूट उंच होते. पण छोटय़ा एक फूट बाय एक फूटच्या कुंडीतही फुलते. फारशी काळजी घ्यावी लागत नाही. फुले येऊन गेल्यावर छाटणी करावी, जेणेकरून नवी जोरकस वाढ होऊन पाने व फुले तजेलदार दिसतात.

[jwplayer mH0pNUA5]

हिरव्यागार तजेलदार पानांचा, पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांच्या फुलांचा अनंत जमिनीत लावल्यास दहा फूट वाढू शकतो, पण कुंडीतही फुलतो. याची पांढरी शुभ्र फुले फार सुगंधी असतात पण ठाशिव रेघांची तजेलदार पानेही सुंदर दिसतात. फुले दोन- तीन दिवस टवटवीत राहतात. आयुर्वेदात मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या डिकेमालीचं व अनंताचं कुटुंब एकच. अनंताच्या मातृवृक्षावर गुटी कलम करून रोपं केली जातात. क्वचित काडी खोचूनही रुजतो. अनंतास ऊन आवडते, पाणी बेताचे लागते. अनंताला आम्लधर्मी माती आवडते. मातीचा सामू अल्कलीधर्मी झाला तर अनंताची मुळे पोषकद्रव्ये शोषू शकत नाहीत, त्यामातीमधून लोहाची मात्रा मिळू शकत नाही व पाने पिवळी पडतात,गळतात व  झाडाचे आरोग्य धोक्यात येते व पाने पिवळी पडतात, गळतात व झाडाचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे दर दोन महिन्यांनी सेंद्रिय मातीचा डोस द्यावा. ताकाचे पाणी घालावे. भारतीय पौराणिक कथांमध्ये ज्या वृक्षाच्या अनेक कथा आहेत, गीतकार व कवींचा जो लाडका वृक्ष आहे तो पारिजातक. जमिनीत लावल्यास वीस-पंचवीस फूट उंच होतो. खरखरीत पाने, सुकुमार, कोमल पांढऱ्या पाकळ्यांची गर्द केशरी देठाची फुले अन् चपटय़ा नाण्यासारख्या बिया हे याचे वैशिष्टय़. सायंकाळी फुले झाडावर नक्षत्रासारखी शोभतात अन् पहाटवेळी आपल्या पायवाटा सजवतात. पारिजातकाची रोपं वाटिकेत मिळतात. कलमी छोटी रोपं पण मिळतात. गृहसंकुलाच्या प्रवेशदाराशी, मंदिराजवळ, तुळशीवृंदावनाजवळ पारिजातक आवर्जून लावावा. गच्चीवर लावायचा झाल्यास मोठी (२ बाय २ बाय २) ची कुंडी, प्लॅस्टीक वा लोखंडी पिंप घ्यावे, कारण छोटेखानी असला तरी तो वृक्षच आहे. त्यास ऊन आवडते. वाढ हळू होते, पण फारशी देखभाल लागत नाही. बहर येऊन गेल्यावर छाटणी करावी लागते. वर्षांतून एकदा कुंडीतली जुनी सेंद्रिय माती बाहेर काढून त्यात नवीन सेंद्रिय माल, थोडी तयार सेंद्रिय माती, नीमपेंड घालून कुंडी परत भरावी जेणेकरून झाडाचे चांगले पोषण होईल व भरपूर फुले येतील. पश्चिम बंगालचे हे राज्यपुष्प आहे. बांग्लादेशचा एक पाहुणा आला होता, त्याने सांगितले, ‘दीदी, खूप पाऊस पडत असला की गरमा गरम खिचडीबरोबर पारिजातकाची पाने तळून आम्ही खिचडी बरोबर खातो. पापडासारखी!’ आपल्याकडेही आयुर्वेदात याचे महत्त्व आहेच, निसर्गात सहज उपलब्ध ते वापरण्याची आपली ही प्रथा आहे. माझ्या लहानपणी प्राजक्ताच्या फुलांचा लक्ष्य वाहण्याचा संकल्प असे. प्रात:समयी अंगणात सडा पडत असे, ती वेचून विष्णूसहस्रनाम म्हणून कृष्णास वाहायची. ते सात्त्विक संस्कार व सात्त्विक गंध देवघरात दरवळत असे. पारिजातकाच्या या झाडांखालीच ‘टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिरभिरत्या तालावर गाणे आमुचे जुळे’ म्हणत आम्हा मैत्रिणींचे बालपण सरले, पण गंधमय आठवणी मागे ठेवून..

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-06-2017 at 02:35 IST
ताज्या बातम्या